यात्रेच्या वर्गणीवरूण नाशिकमध्ये गोळीबार, एकाच्या पाठीत घुसली गोळी 

Firing
नाशिकरोड, पुढारी वृतसेवा – मागील यात्रेच्या वर्गणीतून वापरण्यास दिलेल्या रकमेवरून एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सचिन मानकर याच्यासह नऊ संशयीतांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील चाडेगाव येथील मानकर मळ्यात राहणारे ज्ञानेश्वर प्रकाश मानकर (वय-28) यांनी फिर्याद दिली आहे. काशाई देवीची यात्रा असल्याने नियोजनासाठी  24 एप्रिलला गावातील मारूती मंदिराच्या सभामंडपात मिटींग बोलाविण्यात आली होती. मिटिंगला उपस्थिती कमी असल्याने मिटिंग रद्द करण्यात आली. त्यामुळे ज्ञानेश्वर घरी जात असताना सचिन मानकर याने ज्ञानेश्वर यास थांबण्यास सांगितले. तुझ्याकडे काम आहे, असे म्हणत सचिनने ज्ञानेश्वरला थांबण्यास सांगितले. त्यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याला शक्य होणार नसल्याचे सांगितले. त्यावर  लवकर परत येऊ, असे सांगत सचिन त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वरला गाडीत बसविले. त्यानंतर सर्वजण चाडेगाव फाट्यावर असलेल्या अमोल शिंदे याच्या हॉटेलवर गेले. याठिकाणी जेवण केल्यानंतर सचिनने ज्ञानेश्वरकडे वीस हजार रूपये मागितले. त्यावर ज्ञानेश्वरने हे पैसे कशासाठी मागतो, असे विचारल्यावर सचिनने मागील जत्रेत तुला 40 हजार रूपये वापरण्यासाठी दिले होते. त्याबदल्यात वीस हजार मला स्वत:ला पाहिजे, असे सचिनने ज्ञानेश्वरला सांगितले. ज्ञानेश्वरने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद होऊन सचिनने त्याला मारहाण केली. घाबरून ज्ञानेश्वर हॉटेलबाहेर पळाल्यानंतर सचिन आणि त्याचे साथीदार मागून पळत आले. त्यापैकी दोघांनी ज्ञानेश्वरला धरून ठेवले. सचिनने कमरेला लावलेले पिस्तूल काढून पैसे देतो की ठार मारू, असे म्हणत  दोन वेळा हवेत गोळीबार केला. त्यावेळी त्याच्या साथीदारांनीही ज्ञानेश्वरला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून ज्ञानेश्वर पळून जाऊ लागल्यानंतर सचिनने त्याच्या दिशेने पिस्तूलातून दोनवेळा गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ज्ञानेश्वरच्या पाठीत घुसली. जखमी अवस्थेत ज्ञानेश्वर हा  गोकूळ नागरे यांच्या घरात घुसला. घडलेला प्रकार नागरे यांना सांगितल्यावर नागरे यांनी स्वत:ची गाडी काढून ज्ञानेश्वरला दवाखान्यात घेऊन जाऊ लागले. त्यावेळी सचिन आणि त्याचे साथीदार नागरे यांच्या गाडीजवळ आले. त्यावेळी सचिननही नागरे यांच्या गाडीत बसला. सरकारी दवाखान्यात न जाता मी सांगतो त्या दवाखान्यात चल, असे दरडावून सचिनने एका खाजगी दखावान्यात ज्ञानेश्वरला दाखल केले. ज्ञानेश्वरने दिलेल्या फिर्यादीवरून सचिनसह नाना हुळहुळे, महेंद्र मानकर, गोकूळ मानकर, सूरज वाघ, आकाश पगार, अमोल नागरे, सतीष सांगळे, नंदू नागरे यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.