युनियन बॅंक अपहार : संशयितास चाळीसगावमधून अटक

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार करून फरार झालेला संशयित आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला चाळीसगाव येथे सापळा रचून पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची (दि. २ जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी अशोक घुगे यांनी दिली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या शेकडो खातेदारांनी शुक्रवारी (दि. 24) सलग दुसऱ्या दिवशी बँकेत मोठी गर्दी करून व्यवस्थापनाला धारेवर धरले.

बँकेचा विमा अधिकारी संदीप देशमुख (रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) याने बँकेतील अनेक खातेदारांच्या मुदत ठेवींमधून परस्पर रक्कम तर काढलीच शिवाय काहींना चक्क फिक्स डिपॉझिटचे बनावट सर्टिफिकेटही दिल्याचे अंतर्गत चौकशीत उघड झाले आहे. या घटनेमुळे बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. घोटाळा उघड होताच संदीप फरार झाला होता. तो मूळ गावी चाळीसगाव भागात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन व पोलिस निरीक्षक अशोक घुगे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

हेही वाचा –