राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

accident

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैअखेर ८ हजार १३५ अपघातांमध्ये ८ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १९ हजार ७१९ अपघात झाले असून, त्यात १६ हजार ६५३ जण गंभीर, किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग सुरक्षितता हा गंभीर विषय असून, दुर्घटनांचा व त्यामध्ये जाणाऱ्या बळींचा आलेख कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता विशेष ‘टास्क’ हाती घेतल्याची माहिती राज्याच्या महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून गेलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल यामुळे वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्यामुळे वाहतूक नियम न पाळल्याने अपघात होत असल्याने त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यावर अंकुश आणण्यासाठी नाशिक येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये मंगळवारी (दि.२९) डॉ. सिंघल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील जिल्हा पोलिस अधीक्षकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत महामार्गांवरील अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे याबाबत आढावा घेतला. बैठकीत राज्यातील महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट, अपघात प्रवण क्षेत्र, रस्त्यांची दुर्दशा, आपत्कालीन मदतीचा प्रतिसाद, टोलनाक्यांवरील आपत्कालीन यंत्रणा व वाहनांची अवस्था, रुग्णवाहिका, महामार्ग पोलिसांचा प्रतिसाद आदी विषयांवर चर्चा केली.

५ जिल्ह्यांत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र

राज्यभरात १ हजार ८ अपघातप्रवण क्षेत्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात आहेत. या पाच जिल्ह्यांत जानेवारी ते जुलै २०२३ या कालावधीत ४ हजार १७० अपघातांमध्ये १ हजार ९०५ प्रवासी ठार झाले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्ह्यात गस्त वाढवून, प्रबोधनासह नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी पथके कार्यरत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

रोड हिप्नोसिसने अपघात वाढले

समृद्धी महामार्गासह इतर मार्गांवर सतत वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या ‘रोड हिप्नोसिस’मुळे अपघात वाढल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदवले आहे. त्यामुळे चालकांनी प्रत्येक दोन-अडीच तासांनी वाहन थांबविणे, चांगली गाणे ऐकणे, दीर्घ श्वास घेणे, डोळे धुणे, कंटाळा आल्यास वाहन थांबवून काही वेळ विश्रांती घ्यावी, यामुळे अपघात टळतील असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

वाहन चालवताना चालकाला झोप येत असल्यास तसा इशारा देणारे मशिन्स बाजारात आहेत. ते कारमध्ये बसवावे. चालकाने पूर्ण झोप झाल्यावर आणि थकवा नसेल तेव्हाच वाहने चालवावीत. वाहन चालविताना प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे.

– डॉ. रवींद्र सिंघल, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महामार्ग

हेही वाचा :

The post राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.