राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत

संजय राऊत, राज ठाकरे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – देशातील नागरिक संविधान वाचविण्यासाठी लढतो आहे. रस्त्यावर येऊ पाहतो आहे. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करतो आहे. अशात राज ठाकरे यांच्या सारखे नेते जर मोदी व शहांसारख्या महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठारे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत नाशिकमध्ये असून माध्यमांशी ते बोलत होते. राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर यावेळी चांगलाच निशाणा साधला. राज ठाकरेंची दखल घ्यावी अशी स्थिती आता राहिली नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, काही नेते व पक्ष यांची दखल घ्यावी अशी त्यांची स्थिती नाही. ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केले, त्याच परिवारातील व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करु पाहणाऱ्यांना सहकार्य करत आहे. हे पाहिल्यावर नक्कीच प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा स्वस्थ बसणार नाही. राज ठाकरे फतव्याकडे वळले आहेत अशी टीका राऊतांनी केली. महाराष्ट्रात 35 ते 40 जागा आम्ही जिंकतो आहोत. आम्ही महाराष्ट्र जिंकू व देशही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींवर टीका करताना, मोदींची प्रकृती बिघडली असून त्यांनी विश्रांती घ्यावी. नाहीतर लोक त्यांना विश्रांती देतील, त्यांना उपचाराची गरज असल्याचे राऊत म्हणाले.

आठशे ते नवशे कोटींचा घोटाळा नाशिक महानगरपालिकेत झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याने जनतेचा पैसा लुटला आहे. त्याचे पुरावे मी देणार असल्याचे राऊत म्हणाले. कोर्टानं केजरीवालांना जामीन देताना सरकारला फटकारलं. त्यांची अटक राजकीय होती असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा –