रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

दुचाकी चोराला अटक,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा– अंबड औद्योगिक वसाहतीत दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांचा तपास पोलिसांनी कसून केला असताना फायनान्स रिकव्हरी एजंटच दुचाकीचोर निघाला. त्याला अटक करत पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ४० हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त केल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर, घरकुल परिसरात गेल्या काही महिन्यांत दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस हवालदार समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे, दिनेश नेहे आदींनी शोधमोहीम सुरू केली होती. यात एका अपार्टमेंटमधून दुचाकीचोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर पोलिस हवालदार श्रीहरी बिराजदार यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित अभिषेक प्रशांत गौतम (रा . डोंगरबाबा खदानजवळ, विल्होळी) याला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली. तपासात तो फायनान्स कंपनीचा रिकव्हरी एजंट असल्याचे निष्पन्न झाले. त्याने एमआयडीसीतील कंपन्या तसेच इमारतीच्या पार्किंगमधून भरदिवसा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. वाहन घेऊन जात असताना त्याला कोणी विचारल्यास फायनान्स कंपनीकडून आल्याची बतावणी करत तो दुचाकी चोरत होता. पोलिसांनी गौतमच्या ताब्यातील सात दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा :

The post रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर appeared first on पुढारी.