उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट

उद्धव ठाकरे www.pudhari.news

 देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या सावरकर या एकाच परिवारातील अनेक सदस्यांना शिक्षा भोगाव्या लागलेल्या आहेत. क्रांतिकारकांचे महामेरू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील जन्मस्थळाला भेट दिल्याने आपले मन प्रसन्न झाले आहे. आजच्या भेटीमुळे आपल्याला पुढील संघर्षासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या वाड्याला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे भगूरनगरीत शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वा. वि. दा. सावरकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख विक्रम सोनवणे व माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी त्यांचे स्वागत केले. स्मारकात ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांचे आगमन होताच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, माजी आ. अरविंद नेरकर, नरेश बुरघाटे, राजेश हजारे, मनोज कुवर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाकरे परिवाराने पुतळ्यासमोर नतमस्तक होत सावरकर यांना अभिवादन केले. त्यानंतर सावरकर वाड्यातील सावरकरांच्या जीवनावर असलेल्या छायाचित्रांची पाहणी करत स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, भगूरच्या माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, संघटक चंद्रकांत गोडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

 

The post उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट appeared first on पुढारी.