रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी

रक्षा खडसे व रोहिणी खडसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रावेर लोकसभा मतदारसंघात बारामतीची पुनरावृत्ती अर्थात भावजयीविरोधात नणंद, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार एकनाथ खडसे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी रात्री उशिरा भेट घेत कन्या रोहिणी यांच्या उमेदवारीसंदर्भात तासभर चर्चा केल्याचे वृत्त आहे. (Raksha Khadse Vs Rohini Khadse)

रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या दुसऱ्या यादीत या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपत आहेत. रक्षा खडसे २०१९ च्या निवडणुकीतही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. आता भाजपने पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी जाहीर करत एकप्रकारे एकनाथ खडसे यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनीदेखील रावेरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत रावेरची जागा जिंकणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची एकनाथ खडसे यांनी कन्या रोहिणीसह आणि समर्थकांसह भेट घेतली. रावेर मतदारसंघांत रक्षा यांच्या विरोधात आपली कन्या रोहिणी यांना उमेदवारी देता येईल का? यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बदं दरवाजाआड झालेल्या या चर्चेतील फारसा तपशील समजू शकला नसला तरी रक्षाविरोधात शरद पवार यांनी रोहिणी यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिल्यास बारामतीप्रमाणे रावेरमध्येदेखील नणंद-भावजय सामना बघायला मिळू शकणार आहे. (Raksha Khadse Vs Rohini Khadse)

मनसेच्या माजी नगरसेविका पवार गटात

मनसेच्या माजी नगरसेविका ॲड. वैशाली भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले हे यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. त्याच्यापाठोपाठ वैशाली भोसलेदेखील पवार गटात सामील झाल्या. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हेदेखील पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

निफाड येथील सभेनंतर नाशिकमध्ये परतलेल्या शरद पवार यांची बुधवारी रात्री उशिरा एकनाथ खडसे यांनी कन्या रोहिणी आणि समर्थकांसह भेट घेत तासभर चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. – कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा :

The post रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी appeared first on पुढारी.