रिपेअरिंगचे पैसे मागितल्याने गॅरेज चालकाचा खून

Crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दुचाकी दुरुस्ती केल्यानंतर पैसे मागितल्याने संतप्त होत वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने गॅरेज चालकास मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचीन उर्फ बबल्या सुरेश सावंत (४२, रा. नाशिक पुणे रोड) असे मृत्यू झालेल्या गॅरेज चालकाचे नाव आहे. सिंधु सुरेश सावंत (६६) यांच्या फिर्यादीनुसार संशयित मयूर कदम व त्याच्या साथीदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सावंत (४२) हे दुचाकी दुरुस्तीचे काम करत. त्यानुसार त्यांनी संशयिताच्या दुचाकी दुरुस्तीचे काम केल्यानंतर दुरुस्तीचे ९ हजार रुपये झाले. त्यापैकी सचिनने मयुरकडे ४ हजार ५०० रुपये मागितले. त्याचा राग आल्याने मयूर याने सचिनसोबत वाद घातला. संशयिताने १७ एप्रिल रोजी संत गाडगे महाराज मठाच्या भिंतीलगत सचिन यांना मारहाण केली. सचिन यांच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर, पायावर लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यामुळे सचिन यांच्यावर आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, शनिवारी (दि.२०) दुपारी दोन वाजता सचिन यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, सचिन यांच्यावर भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हा गुन्हा भद्रकाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तपास केल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन अविवाहित होते. मिळेल ते काम करुन त्याचा उदरनिर्वाह सुरु होता, अशी माहिती भद्रकालीचे गुन्हे निरीक्षक विक्रम मोहिते यांनी दिली. संशयित पसार झाले असून, त्यांच्या मागावर पथक रवाना केले आहे.

हेही वाचा –