नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड- शो आयोजित करण्यात आला आहे. यादृष्टीने पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (दि.९) रात्री उशिरा राेड-शो मार्गाची पाहणी केली. यावेळी यंत्रणांना काही सूचना त्यांनी केल्या.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) २७ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांचा रोड-शो होणार आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पाेहोचली आहे. देशभरातील हजारो विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत, या महोत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपाेवन मैदानाची पाहणी केली होती. त्यावेळी नियोजनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत भुसे यांनी मैदानावर उपस्थित राहत आढावा घेतला. यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, कामकाजासाठी २० समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. देशभरातून 8 हजार युवक सहभागी होणार आहेत. तपोवन येथे उद्घाटन होईल, हनुमान नगरच्या मैदानात इव्हेंट होतील. कालिदास कलामंदिरात स्पर्धा होतील. तसेच महात्मा फुले सभागृहात फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात गायन स्पर्धा, उदोजी महाराज सभागृहातदेखील विविध कार्यक्रम होतील.
राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये नाशिकचे स्थानिक खेळाडू, कलाकारांचा यांचा सहभाग असणार आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ नाशिकला मिळणार आहे. हा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रॅण्डिंगची मोठी संधी असून, त्याचे आपण सोने करूया. – दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
——————
हेही वाचा :
- Thane News: वसईत अवकाळीमुळे फळबागा, पिकांवर पसरली अवकळा
- Rajnath Singh meets UK PM Rishi Sunak | भारत- ब्रिटन संबंध अधिक मजबूत, राजनाथ सिंह यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट
- Pune News : विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन 17 जानेवारीला
The post रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.