लाचखोर फरार गर्गेंच्या घराची एसीबीकडून झडती

लाचखोर तेजस गर्गे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी व लाच मागण्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस मदन गर्गे यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधित विभागाने घेतली. यात गर्गे दाम्पत्याच्या बँक खात्यात २० लाख रुपये, घरात ३ लाख १८ हजार रुपये, तीन टीबी क्षमतेच्या हार्डडिस्क व गर्गे दाम्पत्याचे पासपोर्ट असे आढळून आल्याचे विभागाने सांगितले.

७ मे रोजी नाशिकच्या तत्कालीन सहायक संचालक आरती आळे यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गर्गे यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारण्यास गर्गे यांनी संमती दिल्याचे आढळून आल्याने गर्गे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून गर्गे फरार असून न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, विभागाने गर्गे यांचे मुंबईतील घर सील केले होते. गर्गे यांच्या पत्नी विशाखा यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२२) घराची झडती घेण्यात आली. त्यात पुणे, औरंगाबाद, मुंबई येथील बँकाचे तपशिल मिळाले. त्यापैकी मुंबईच्या बँक खात्यात २० लाख रुपये आढळून आले. तसेच घरात २ व १ टीबी हार्डडिस्क आढळून आल्या आहेत. या हार्डडिस्क मधील माहिती तपासण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, गर्गे हे अद्याप फरार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा –