‘लिव्ह इन पार्टनर’ची आर्थिक फसवणूक

न्यायालय pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात असताना संशयिताने तिच्या नावे परस्पर कर्ज काढून तसेच क्रेडिट कार्डमार्फत आर्थिक व्यवहार करीत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका परिसरातील रहिवासी महिलेने संशयित मनोज गवई (४२) याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले असून, ती खासगी नोकरी करते. तिच्या फिर्यादीनुसार, दि. १ मे २०२२ पासून ती संशयित मनोजसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. त्याने तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिच्या कागदपत्रांच्या आधारे त्याने वेगवेगळ्या बँक, फायनान्स कंपन्यांमधून कर्ज काढले. महिलेच्या क्रेडिट कार्डवरूनही आर्थिक व्यवहार करीत त्याने लाखो रुपये काढले. मात्र, कर्जाची परतफेड त्याने केली नाही. कर्जवसुलीसाठी तगादा लागल्याने हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. तिने याबाबत चौकशी केल्यानंतर मनोजने कर्ज घेतल्याचे उघड झाले. मात्र, मनोजने कर्जाची परतफेड केली नाही किंवा पैसेही परत केले नाही. त्यामुळे महिलेची २० लाख नऊ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तिने मुंबई नाका पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

संशयितावर यापूर्वीही गुन्हा दाखल
मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या माहितीनुसार, संशयित फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. याआधीही संशयित मनोजविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो मधाळ बोलून समोरच्याचा विश्वास जिंकून त्यास गंडा घालत असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा:

The post 'लिव्ह इन पार्टनर'ची आर्थिक फसवणूक appeared first on पुढारी.