लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा

“मी एकट्याने मतदान नाही केलं तर एवढा काय फरक पडतो आहे”. मतदानानिमित्त सुट्टी आहे, सुट्टीचा आनंद घरीच घेऊया किंवा कुठेतरी फिरायला जाऊया अशी काहीशी मानसिकता गेली काही वर्ष मतदानाच्या घटणाऱ्या टक्केवारी वरून दिसून येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रम अंतर्गत निवडणुक आयोग, भारत सरकार मार्फत विवीध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या जनजागृती कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालये व सामाजिक संघटनाचा सहभाग नोंदवला जात आहे. आदियोगी फाऊंडेशन, नाशिक यांनीही मतदान जनजागृतीसाठी अभिनव लग्नपत्रिकेव्दारे उपक्रम राबविला आहे. फाऊंडेशनचे सचिव नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून एक अभिनव लग्नपत्रिका तयार करून नाशिक लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येत आहे.

लोकसभा – २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी साधण्याची विनंती करून उज्वल भारताची स्वप्ने जर प्रत्यक्षात उतरवायची असतील तर आपलं एक पाऊल मतदान केंद्राच्या दिशेने पडलच पाहिजे असा आग्रह या पत्रिकेतून करण्यात येत आहे.  भारतीय लोकशाही मजबुत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच धर्म, जात, समाज, भाषा यांचा प्रभाव निवडणुकीवर पडू न देता नक्की मतदान करा. एक-एक मतदानरूपी आशिर्वादाने लोकसभा निवडणुकीचा हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा यासाठी नागरीकांना आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे.

फाऊंडेशनचे अध्यक्ष जिभाऊ खैरनार, कोषाध्यक्ष वैशाली बच्छाव, मनिषा पाटील, हर्षल पवार व  लोकसभा निवडणुकीनिमित्त पहिल्यांदा मतदान करणारा नवमतदार सर्वेश खैरनार यांनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघातील विवीध भागात दर रविवारी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सचिव नितीन पाटील यांनी दिली.

पत्रिका pudhari.news
इंदिरानगर : मतदान जागृती उपक्रम अंतर्गत अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप करून मतदानाला यायचं हं…असं आग्रहाचे निमंत्रण देतांना आदियोगी फाऊंडेशनचे सचिव नितीन पाटील, जिभाऊ खैरनार, वैशाली बच्छाव, मनिषा पाटील, हर्षल पवार व सर्वेश खैरनार. (छाया: तुषार जगताप)

The post लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप appeared first on पुढारी.