वकिलांना काळा कोट न वापरण्यास मुभा, उन्हाळ्यापुरता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. त्यातच न्यायप्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांनाही काळा कोट घालून त्यांचे कामकाज करताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वकिलांना जून महिन्यापर्यंत विना कोट काम करता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. वकीलवर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

उन्हाळ्याचा तडाखा वाढत असून, नाशिक जिल्ह्यातही त्याच्या झळा सर्वांना बसत आहे. तापमान चाळिशी कडे जात असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदारवर्गासही त्याचा फटका बसत आहे. न्यायप्रक्रियेत वकिलांना कामकाज करताना काळा कोट घालणे बंधनकारक असते. काळा कोट ही वकिली पेशाची ओळख असून, न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडतांनाही काळा कोट घालावाच लागतो. त्यामुळे वकिलांना कोटशिवाय कामकाज करता येत नाही. मात्र उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत वकिलांना काळा कोट न घालता कामकाज करण्यास मुभा दिल्याने वकिलांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे नाशिक बार असोसिएशनने स्वागत केले आहे. तसेच अनेकांनी कोट न घालता कामकाजास सुरुवात केली आहे. तर काही जण त्यांच्या सोयीनुसार काळा कोट घालून कामकाज करत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post वकिलांना काळा कोट न वापरण्यास मुभा, उन्हाळ्यापुरता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.