वडनेर भैरवला रथ मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू, दोन्ही पायांवरून चाक गेल्याने दुर्घटना

मृत्यू

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील वडनेर भैरव गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज व योगेश्वरी माता यात्रोत्सवानिमित्त गावातून रथ मिरवणूक सुरू असताना ५८ वर्षीय व्यक्तीचा गर्दीत तोल जाऊन ते खाली पडले. त्यांच्या पायांवरून रथाचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मयत राजाराम पुरकर

तालुक्यातील वडनेर भैरव गावाचे ग्रामदैवत असलेले श्री कालभैरवनाथ महाराज व योगेश्वरी माता यांचा दरवर्षीप्रमाणे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवानिमित्त श्री कालभैरवनाथ महाराज व योगेश्वरी माता यांचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडतो. विवाह सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रथ मिरवणुकीसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. सोमवार (दि.२२) दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर रथाची मिरवणूक आली असता राजाराम दगडू पूरकर (५८. रा. पिंपळणारे रोड, वडनेर) यांचा गर्दीत तोल जाऊन खाली पडले. त्यावेळी त्यांच्या दोन्ही पायांवरून रथाचे चाक गेल्याने पूरकर गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तांगड करीत आहे.

हेही वाचा –