नाशिकची जागा शिंदे गटाच्या हातून निसटणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री खलबतं

हेमंत गोडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकवरून महायुतीत संघर्ष कायम असून, भाजपच्या नव्या भूमिकेमुळे ठाण्यासाठी नाशिकच्या जागेवर पाणी सोडण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही आता आक्रमक भूमिका घेतल्याने महायुतीत शिंदे गटाची कोंडी झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री तीनपर्यंत नाशिकच्या जागेवरून खलबतं रंगली असून, उमेदवारीसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता नाशिकची जागा शिंदे गट राखणार की भाजप, राष्ट्रवादीला संधी मिळणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत संघर्षाला सुरुवात झाली. भाजप आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही नाशिकवर केलेल्या दाव्यावरून महायुतीत निर्माण झालेला वाद गेल्या महिनाभरापासून कायम आहे. विशेषत: या मतदारसंघातून छगन भुजबळ यांची एन्ट्री आणि त्यानंतर त्यांनी स्वत:हून घेतलेल्या माघारीमुळे उमटलेले पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरले आहेत. भुजबळांच्या माघारीनंतर ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटेल, असे बोलले जात असताना भाजपने या जागेसाठी थेट ठाण्यातील जागा अडवून धरल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा भाजपकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न असला तरी नाशिकच्या तुलनेत ठाण्याची जागा मुख्यमंत्र्यांसाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे ठाणे की नाशिक असा निर्णय घेण्याची वेळ आल्यास मुख्यमंत्र्यांकडून ठाण्याच्या जागेलाच पसंती दिली जाईल, हे उघड सत्य आहे. त्यामुळेच नाशिकमधील शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या प्रस्तावानंतर खा. गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी तत्काळ मुंबईच्या दिशेने धाव घेतली. दोघांपैकी उमेदवारी कोणालाही मिळो जागा शिंदे गटाकडेच राहावी, यासाठी उभय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातली. मध्यरात्री ३ वाजता झालेल्या या बैठकीला पक्षाचे युवा नेते श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. दरम्यान उमेदवारीच्या गोंधळात पक्षाची जागा जाऊ नये यासाठी गोडसे यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा

शिंदे गटाकडून गोडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात असले तरी त्यांची उमेदवारी पक्षाकडून घोषित करण्यात आलेली नाही. येत्या दोन दिवसांत ही घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले. अर्थात भाजप आणि राष्ट्रवादीनेदेखील या जागेवरील दावा तीव्र केला आहे. ओबीसी समाजापाठोपाठ समता परिषदेनेदेखील भुजबळांच्या उमेदवारीचा आग्रह धरत शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा –