वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

मोक्का,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वर्चस्ववादातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणातील आठ संशयितांविरोधात शहर पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाई केली आहे.

अंबड परिसरात वैभव शिर्के व दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद आहे. ७ एप्रिलला वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून दर्शन दोंदे याने त्याच्या टोळीतील इतर गुंडासोबत मिळून वैभववर प्राणघातक हल्ला केला. त्यात वैभववर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून तसेच धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सखोल तपास केला असता संशयित दर्शन हा सराईत गुंड असून त्याचे साथीदार गणेश खांदवे (२८, रा. इंदिरानगर), राकेश गरुड (३२, रा. उत्तमनगर), अथर्व राजधर उर्फ खग्या (२०, रा. पाथर्डी फाटा), अजय राऊत उर्फ बट (२७, रा. होलाराम कॉलनी), जितेंद्र चौधरी उर्फ छोट्या काळ्या (२६, रा. बंदावणे नगर), महेश पाटील उर्फ बाळा (२१, रा. रायगड चौक), अक्षय गावंजे (२४, रा. सावता नगर) यांच्यासह मिळून वैभववर प्राणघातक हल्ला केल्याचे उघड झाले. संशयितांनी संघटितपणे गुन्हे करीत शस्त्र बाळगून शहरातील अंबड, उपनगर, आडगाव, सरकारवाडा, मुंबईनाका, इंदिरानगर परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची जाळपोळ करणे, दंगा करणे, मारहाण करणे आदी ५३ गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे.

हेही वाचा –