सटाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वीरगावजवळ वाळूच्या डम्परने पाठीमागून दोघा ट्रॅक्टरला धडक दिल्याने एक ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला असून, रस्त्यावर कांदा सांडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून खानदेशकडून नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात डंपरमधून वाळू वाहतूक होत असते. भरधाव वेगाने होणारी ही वाळू वाहतूक अपघातांना निमंत्रण ठरत आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास ताहाराबादहून सटाण्याच्या दिशेने येत असलेला वाळूचा डंपर (एमएच ४६ पीएफ ०९९३) याने पाठीमागून येत निताणे येथून देवळा येथे कांदा विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. खास बाब म्हणजे पहाटेच्या सुमारास निताणे येथून चार ट्रॅक्टर सोबतच निघाले असताना या डंपरने वीरगावजवळ हॉटेल दुर्गाजवळ एकाच वेळी दोघा ट्रॅक्टरला धडक दिली. त्यापैकी एका ट्रॅक्टरवरील चालक प्रभाकर खंडू पवार हे गंभीर जखमी झाले. धडकेनंतर ट्रॅक्टर जवळपास दोनशे फूट अंतरापर्यंत फरफटत गेला. या घटनेत दोन्ही ट्रॅक्टरमधील कांदा रस्त्यावर सांडला जाऊन शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अपघाताची नोंद करीत डंपरचालकास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
- Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघात 48 उमेदवारांचे अर्ज वैध: विश्वनाथ फाळेगावकर पहिला तृतीयपंथी उमेदवार
- नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील मृतांची नावे आली समोर; 5 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी
The post वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा; appeared first on पुढारी.