Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला

मुसळगाव कारखाना आग,www.pudhari.news

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील (स्टाइस) त्र्यंबक प्लास्टीक या कारखान्याला शुक्रवारी (दि.5) दुपारी 4.25 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील मशिनरींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मुसळगाव येथील त्र्यंबक प्लास्टीक या कारखान्यात अॅक्रॅलिक शीटचे उत्पादन घेतले जाते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे कारखान्यातील उत्पादन विभागाला आग लागली. आगीचा प्रकार कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. त्यामुळे जिवितहानी झाली नाही.

तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच आग विझविण्यासाठी एमआयडीसी व नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस निरीक्षक यशवंत बावीस्कर, हवालदार नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, मोहित निरगुडे आदींनी घटनास्थळी मदतकार्य केले.

नगर परिषद व एमआयडीसी अग्निशमन दलाचा एकेक अशा दोन बंबांसह स्टाइसच्या बंबाने अवघ्या वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे.

पंधरा कामगारांचे वाचले प्राण
या कारखान्यात आग लागली त्या भागात पंधरा कामगार काम करीत होते. मात्र आग भडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून सुरक्षितरित्या पलायन केले. त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. कामगारांच्या समसुचकतेमुळे जिवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा :

The post Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.