गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच

दादा भुसे, हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तणाव आता अधिकच वाढला असून, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनीदेखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही घमासान सुरू असल्याचे चित्र आहे. Nashik Lok Sabha

यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच वादळी ठरत आहे. नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीत सुरुवातीला रंगलेला वाद ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर पेल्यातील वादळ ठरले. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे, तर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या विजय करंजकर यांच्या मनधरणीचे प्रयत्नही ठाकरे गटाकडून सुरू आहेत. महायुतीत मात्र नाशिकची जागा भाजपची, शिंदे गटाची की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यावरूनच रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे या मतदारसंघातून तब्बल दोन वेळा सलग निवडून आल्यामुळे या जागेवर शिंदे गटाचा मूळ दावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर मात्र भाजपच्या आकांक्षा वाढल्या आहेत. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी स्थानिक भाजपेयींची मनीषा आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या जागेसाठी आग्रह धरला आहे. या मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता आहे. खा. गोडसे यांनी तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही त्यांना उमेदवारी मिळू न शकल्यामुळे ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाठ यांनी नाशिकची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा करत भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह अनाठायी असल्याचे सांगितले होते. गोडसे यांनीदेखील नाशिकची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा दावा कायम ठेवला आहे. पाठोपाठ आता पालकमंत्री भुसे यांनीदेखील नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील, असा दावा करून, उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात उडी घेतली आहे. भुसे म्हणाले की, नाशिक लोकसभेची स्टॅण्डिंग जागा ही शिवसेनेची आहे. नैसर्गिकरीत्या ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे, हा दावा कायम आहे. या क्षणालादेखील आमचा दावा आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे केलीत. महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील, तसे मार्गक्रमण करणे शिवसैनिकांचे काम आहे, असेही भुसे यांनी सांगितले आहे. Nashik Lok Sabha

महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक Nashik Lok Sabha

लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे-पुढे होत असतात. काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला, मात्र बहुतांश ठिकाणी विद्यमान खासदार आहेतच. महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा एकत्र करत आहेत. रिपाइं गट महायुतीचा भाग आहे, एकदिलाने काम करणार आहोत. खा. आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल. हा आम्हाला विश्वास असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

गुढीपाडव्याआधी उमेदवाराची घोषणा

महायुतीच्या उमेदवाराची घोषणा गुढीपाडव्याआधी होईल, असा दावा खा. गोडसे यांनी केला आहे. महायुतीसाठी कुठलाही उमेदवार देताना प्रत्येक खासदार हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाशिकची उमेदवारी इलेक्टिव्ह मेरिटवर दिली जाईल. जो उमेदवार निवडून येणारा आहे, त्यालाच उमेदवारी मिळेल, असे नमूद करत नाशिकची उमेदवारी शिवसेनेलाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

The post गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच appeared first on पुढारी.