गेल्या काही महिन्यांत निसर्गातील अद्भुत बदल बघावयास मिळत असून, अनेक वृक्ष नेहमीपेक्षा दीड महिना अगोदरच फुलांनी बहरत असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघावयास मिळत आहे. विविध पक्ष्यांनीसुद्धा दीड महिनाअगोदर घरटे बंधायला सुरुवात केली आहे. वातावरणाचा फटका ऋतुचक्राला बसत असून, यावर्षी पावसाळा ‘मे’च्या आसपास सुरू होण्याचा अंदाज या संकेतामुळे मिळत आहे.
सध्या पिंपळासारख्या झाडांना फुटू लागलेली कोवळी लुसलुशीत पालवी आणि वसंत ऋतूमध्ये अनेक वृक्ष बहरून गेल्याचे दिसून येत आहे. पळस, पांगारा, स्पेतोडिया, गिरीपुष्प, पांढरी सावर, टाब्युबिया, ताम्हन, सीता अशोक, गुलाबी कॅशिया, बहावा, शिवन अशा प्रकारची किती तरी झाडे फुलांचा संभार लेवून फेब्रुवारी ते मे दरम्यान उभी असतात. पोपटाच्या चोचीच्या आकाराचा पळस अर्थात फ्लेम ऑफ द फॉरेस्ट सर्वात प्रथम उन्हाळ्याची चाहूल देतो. त्याच्या पानाचा उपयोग पत्रावळी बनविण्यासाठी होतो. तर बुलबुल, वटवट्या, कोतवाल, दयाळ, कावळे, साळुंक्या यासारख्या अनेक पक्ष्यांच्या आवडीचे झाड म्हणजे पांगरा. अशी झाडे बहरण्याचा कालावधी म्हणजे वसंत. प्रत्येक वृक्षांचा बहरण्याचा कालावधी ठरलेला असतो. माणूस चुका करेल पण निसर्ग कदापि चुकणार नाही. वृक्ष वेळेचे गणित कधीच चुकवीत नाही. असे जरी असले तरी गेल्या दोन वर्षांपासून वृक्षांचा बहरण्याचा कालावधी दीड ते दोन महिने अगोदर होत आहे. नीलमोहर वृक्ष वर्षातून तीनदा बहरतोय, स्पेतोडिया दोनदा, सप्तपर्णी दोनदा, पलस, पांगारा, काटेसावर, बहावा आदी वृक्ष त्याच्या नैसर्गिक फुलोऱ्याच्या साधारण ३० ते ४५ दिवस अगोदर फुलली आहेत. वातावरणातील परिणामाचा निसर्गसाखळीवर परिणाम दिसू लागले आहेत. तसेच कोकीळ, सूर्यपक्षी आपल्या विनीला तब्बल दीड महिना अगोदर सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पक्ष्यांची पिल्ले घरट्यातून बाहेर पडतात व पावसाळ्यात कीटकांचे प्रमाण जास्त असल्याने या पिल्लांना खाद्य उपलब्ध होते. पण या वर्षी हा कालावधी तब्बल दीड महिना अगोदरचा आहे. यामुळे या वर्षाचा पावसाळा मे च्या शेवटी सुरू होण्याचे संकेत हे वृक्ष, पक्षी देऊ लागले आहेत.
बहावा हा वृक्षदेखील चक्क एक महिना अगोदर बहरला आहे. वनस्पती आणि प्राणिजीवन यांच्यातील संबंध खूपच दाट आहे. पर्यावरणानुसार वृक्ष बदलतात. त्याच्यावर अवलंबून असलेली जीवसृष्टी बदलते. वातावरणात होणारा अल्प बदल निसर्गाची जीवनसाखळीच बदलून टाकतो. या सर्वाला जबाबदार आहे प्रचंड वृक्षतोड आणि सिमेंटची वाढत चाललेली जंगले. गेल्या पाच दशकांत उष्णता ४ ते ५ डिग्रीने वाढलेली आहे. शहरीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पेवरब्लॉकमुळे जमिनीत पाणी झिरपणे कमी झाले. अनेक ठिकाणी जमीन, वातावरण वेगवेगळे असल्याने असे होत असते, असेदेखील मत काही अभ्यासक मानतात. मतमतांतरे काही असो पण वनस्पती, प्राणी आणि पक्षी निसर्ग बदलांचे अनेक संकेत देतात, हे मात्र नक्कीच.
यामुळे चुकतो फुलांचा बहर
वातावरणातील उष्णता वाढताच हवेतील बाष्प कमी होते. जमिनीच्या वरच्या थरातील पाणी कमी झाल्याने सफेद मुळांना पाणी मिळणे कठीण होते. उष्ण वातावरणात पाणी कमी पडल्याने ऊर्जेचा वापर करणे वृक्षांना शक्य होत नाही. परागीकरणाचे कार्य बिघडते. जर अचानक पाऊस पडला तर पेशीत पाण्याचा दाब वाढतो आणि नैसर्गिक प्रकियेत अडथळा निर्माण होतो आणि फुलांचा बहर चुकू शकतो.
जानेवारी ते मे मध्ये बहरणारी वृक्ष
फेब्रुवारी – पांढरी सावर, वारस, मोह, पलस , कडुलिंब, टाब्युबिया,
मार्च – सफेद खैर, पांगरा, शिरीष, नागचाफा
एप्रिल – आपटा, बेल, नीलमोहर,
मे – ताम्हन, तिवर, बहावा, कदंब, गुलमोहर, सीता अशोक
पक्षी घरटी बनविण्याचे महिने
मुनिया – जून ते ऑक्टोबर
सनबर्ड – मार्च ते मे
चष्मेवाला – मार्च ते मे
सातभाई – मार्च ते सप्टेंबर
टेलरबर्ड – एप्रिल ते सप्टेंबर
बनटिंग – एप्रिल ते ऑगस्ट
बुलबुल – फेब्रुवारी ते मे
कोकिळा – एप्रिल ते ऑगस्ट