‘शरण’ संस्था: निराधार प्राण्यांवर उपचार; ‘मंगलरूप’ गोरक्षणाचा वसा

नाशिक : नील कुलकर्णी

नाशिकसह जिल्ह्यात मोकाट, निराधार जनावरांची संख्या वाढतच आहे. त्यामध्ये केवळ कुत्री, गाढवच नसून गायी, बैल, घोडे, यांचीही मोठी संख्या आहे. अशी मोकाट जनावरे अनेक वेळा आजारी असतात. त्यातील काही मरणासन्न अवस्थेतही अखेरची घटका मोजत असतात. निसर्गाचा भाग असलेल्या आणि परिसंस्थेवर परिणाम करणाऱ्या अशा पक्षी- प्राणिमात्रांवर भूतदयेतून उपचार करणाऱ्या आणि त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे कार्य उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यातही काैतुकास्पद ठरत आहे.

शरण संस्थेच्या कार्याची व्दिदशकपूर्ती :

नाशिक येथील शरण्या शेट्टी यांनी वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन २००२ मध्ये मुक्या प्राण्यांसाठी शरण संस्था स्थापन केली. रस्त्यावर जखमी झालेल्या तसेच आजारी प्राण्यांवर संस्थेमार्फत मोफत उपचार केले जातात. श्वान, मांजरी, बैल, घोडा, गाढव आणि प्रसंगी डुकरांवरही संस्थेमार्फत उपचार केले जातात. श्वानांना उपचार करून पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाते. प्राण्यांचे डॉक्टर जनावरांवर निरपेक्ष हेतूने उपचार करतात. मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी कचरा डेपोजवळ महापालिकेने शरण संस्थेसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली आहे. दानशूरांच्या मदतीने आणि कंपन्यांच्या सीएसीआर निधीतून प्राण्यांवर संस्थेमार्फत उपचार केले जातात. संस्थेचे स्वयंसेवक शहरभर काम करतात. इतकेच नाही प्राण्यावर अन्याय होत असल्यास कायदेशीर मार्गाने लढा देऊन मुक्ती केली जाते. संस्थेचा महिन्याचा खर्च सुमारे दीड ते तीन लाख इतका असतो.

आजवर १५ हजार मोकाट कुत्र्यांवर उपचार केले आहेत. सर्व प्राण्यांना आश्रयस्थान देणारे उत्तर महाराष्ट्रातील आमचे पहिलेच होस्टेल आहे. येत्या काही दिवसांत आम्ही पंचवटीत प्राण्यांसाठी रक्ततपासणी, एक्स-रे, स्कॅन मशीन, हार्ट रेट मॉनिटर आदी उपकरणे, यंत्र असलेले अद्ययावीत चाचणी अणि उपचार केंद्र सुरू करणार आहोत. मुक्या जीवांसाठी काम करण्याचे समाधान मोठे आहे. याच कामासाठी आयुष्य सत्कारणी लागावे. – शरण्या शेट्टी, संस्थापक, शरण संस्था

मंगलरूप गोशाळेचे कार्य मंगलमय

बालपणापासून पुरुषोत्तम आव्हाड यांना प्राण्यांबद्दल प्रेम होते. २०१२ मध्ये त्यांनी कार्य सुरू केले. इगतपुरी येथे जात असताना एका अपघातग्रस्त गोमातेला बघून त्याचे हृदय द्रावले. अज्ञात वाहनाने गायीला जोरदार धडक दिली होती. त्यावेळी गंभीर जखमी गायीला त्यांनी घरी आणले. तिच्यावर उपचार करून सांभाळ केला. तिथून त्यांच्या पवित्र सत्कर्मास प्रारंभ झाला. पशुवैद्यकदिनाच्या औचित्यावर २७ एप्रिल २०१६ रोजी मंगलरूप गोशाळेची नोंदणी झाली. आज एक तपाहून अधिक काळ ते गोवंशीय जनावरे तसेच इतर प्राण्यांसाठी कार्य करत आहेत. हजारो प्राण्यांवर मंगलरूप गोशाळेने उपचार केले आहेत. २५ बेवारस गोमातांची सुखरूप प्रसूतीही केली. गेल्या वर्षी त्यांनी १७७ उंटांची नाशिकमधून सुटका केली. त्यांचे कार्य बघून ॲनमिल वेल्फेअर बोर्डावर आव्हाड यांची मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

रूपाली जोशी यांच्याकडून प्रेरणा घेत कार्याला सुरुवात केली. नंतर संस्था सुरू केली. १२ वर्षांत हजारो गोवंश तसेच इतर प्राण्यांवर उपचार आणि सुटकेचे कार्य केले. आमच्या रुग्णवाहिका जिल्हाभर फिरून जखमी प्राण्यांवर उपचार करतात. मनेका गांधी यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये गेल्या वर्षी १७७ उंटांची सुटका केली. – पुरुषोत्तम आव्हाड, प्राणिप्रेमी, संस्थापक, मंगलरूप गोशाळा

‘शरण’मध्ये असलेले प्राणी असे…

  • गोवंश : ६५
  • कुत्री : ११३
  • मांजरी २२
  • बकऱ्या : ६
  • डुकरे : १३
  • घोडे : ६
  • गाढव :१