
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा उत्सव रविवारी (दि. २४) सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. होळीमध्ये दुष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचे दहन करताना चांगली वृत्ती, चांगले विचार अंगीकारण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
हिंदू धर्मात सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. शहर व परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील वातावरण भक्तिमय झाले हाेते. ठिकठिकाणी दिवसभर पारंपरिक पद्धतीने गोवऱ्या व लाकड्याच्या सहाय्याने होळी रचण्यात आली होती. सायंकाळनंतर ढोल-ताशाच्या तालावर आबालवृद्धांनी होळीभोवती ठेका धरला. तसेच महिला वर्गाने होळीची गीते सादर केली. त्यानंतर हाेलिकादेवीचे पूजन करून विधिवतपणे हाेळीचे दहन करण्यात आले. यावेळी भाविकांनी स्वत:मधील अहंकार, द्वेष, मोह, मत्सर व क्रोधाचे दहन होळीमध्ये केले. याप्रसंगी होळीला पुरणपोळीचा नैवैद्य अर्पण करण्यात आला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही होळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. विशेष करून आदिवासी भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी हा सण साजरा करत निसर्गाप्रति आपली सेवा अर्पण केली. यावेळी रात्री उशिरापर्यंत आदिवासी बांधवांनी होळीभोवती फेर धरत नृत्य केले.
शुभेच्छांचा वर्षाव
होळी सणानिमित्त नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मंगलमय होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होऊन तुमच्या जीवनात आयुष्य, सुख, आरोग्य व शांती नांदो आदी प्रकारच्या संदेशांमधून नाशिककरांनी शुभेच्छा दिल्या. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्ट्रा यासारख्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला होता.
हेही वाचा:
- Lok Sabha Election 2024 | खासदार हेमंत गोडसे यांचे उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन
- ‘राजगड’ जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज! प्रशासनाकडून जोरदार तयारी
- लंकेंच्या एंट्रीनंतर ‘यांची’ होणार इन्कमिंग : कोल्हेंचे विधान चर्चेत
The post शहर-परिसरात होळीचा उत्साह; आदिवासी बांधवांमध्येही आनंदीआनंद appeared first on पुढारी.