शासकीय कामकाज दोन महिने थंडवणार, कार्यालये पडणार ओस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-देशातील लोकसभा निवडणुकांचा बिगुल शनिवारी (दि.१६) वाजणार आहे. आचारसंहितेमुळे पुढचे दोन महिने विकासकामांवर मर्यादा येणार आहेत. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हा समितीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या फाईली हातावेगळ्या केल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. हा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल. मे अखेरपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असा अंदाज आहे. त्यामुळे आचारसंहितेची धास्ती घेत लोेकप्रतिनिधी व त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी शुक्रवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती बाहेर फाईली मंजुरीकरीता ठिय्या मांडला. यावेळी अधिकाऱ्यांनी निधीची उपलब्धता व कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे सूचना केली. त्यामुळे एैनवेळी स्वीय सहाय्यकांची चांगलीच धावपळ उडाली.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता बघता तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन समितीकडून वारंवार करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही लोकप्रतिनिधींनी कामे प्रस्तावित करीत १०० टक्के निधी खर्च केला. परंतु, काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर निवडणुकांची शनिवारी (दि.१६) घोषणा होणार हे जवळपास निश्चित झाल्याने खडबडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधींनी कामांच्या मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे धाव घेतली. मात्र, अधिकाऱ्यांनीदेखील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानूसार विकासकामांचे प्रस्ताव दाखल करुन घेतले. तसेच परिपूर्ण प्रस्तावांवर स्वाक्षरी करुन तातडीने ते हातावेगळे करत निधीची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला.

कार्यालये ओस पडणार

लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेमुळे पुढचे दोन महिने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयांमधील कामकाज थंडवणार आहे. आचारसंहितेत कोणताही महत्वपूर्ण निर्णय हाेणार नसल्याने सामान्य जनतादेखील कार्यालयांकडे फिरकणार नाही. त्यामुळे नागरिकांअभावी कार्यालये ओस पडणार आहेत.

हेही वाचा –

The post शासकीय कामकाज दोन महिने थंडवणार, कार्यालये पडणार ओस appeared first on पुढारी.