राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांचे खिसे रिकामे केले. सोन्याचे दागिने, मोबाइल फोनसह राेकडही हातोहात लांबविल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे राहुल गांधी आले असता, त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रॅलीबरोबरच त्यांनी घेतलेल्या सभेलादेखील गर्दी झाली होती. मात्र, या गर्दीचा फायदा घेऊन काही भामट्यांनी अनेकांच्या खिशांवर हात साफ केले. राजू लक्ष्मण कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, द्वारका सर्कलसमोरील राधिका हॉटेल येथे दुपारी 2.30 च्या सुमारास राहुल गांधी यांना भेटण्यास झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन, अनेकांचे दागिने मोबाइल लंपास केले गेले. सुमारे तीन लाख ६३ हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, रॅली आणि सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशातही चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून अनेकांचे खिसे कापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

The post राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.