शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सहा महिन्यांपुर्वी महाराष्ट्रात असंवैधानिक शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. १६ आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार कायम आहे. येत्या १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी वर्तविले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर आ. विलास पोतनीस, अजित अभ्यंकर, सुनिल बागूल, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, भानुदास माळी, डॉ. तुषार शेवाळे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, शरद आहेर, शाहू खैरे, विलास शिंदे, हेमलता पाटील, अर्जुन टिळे, राहूल दिवे, उमेदवार शुभांगी पाटील, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक धनशक्तीविरूध्द जनशक्ती अशी होणार आहे. भाजपला उमेदवार न मिळणे हे दुदैवी आहे. या निवडणुकीच्या रूपाने क्रांतीला सुरूवात करण्याची संधी सुशिक्षित मतदारांना मिळाली आहे. ही लढाई केवळ राजकीय पक्षांची नसून, मतदारांच्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी पेटून उठले पाहिजे. मतदारांनी जागे न झाल्यास लोकशाही धोक्यात येईल, असे पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरे करण्यात व्यस्थ आहे. मोदी-शहांचे हस्तक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे चुकीचे असून, हा संपुर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव करताना मुख्यमंत्र्यांनी केले भाषण केवळ मनोरंजनात्मक होते. शिंदे सरकार रूपाने महाराष्ट्रात तमाशा सुरू असल्याचे पटोले यांनी सांगितले.

भाजपकडून सत्तेचा दुरूपयोग

केंद्र आणि राज्यातील सत्तेचा दुरूपयोग भाजपकडून केला जात आहे. लोकशाहीचा गळश घोटण्याचे काम भाजप करत आहे. संविधानाने एका चहावाल्याला पंतप्रधान केले. आता संविधानच संपविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हेही वाचा :

The post शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित appeared first on पुढारी.