नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एकाला १७ लाख ७५ हजार १०० रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी त्यांना दि. १९ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान गंडा घातला. संशयितांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून नाशिकच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यात कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यानुसार भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात नाशिकच्या व्यक्तीने सुरुवातीस पैसे टाकले. त्यावर नफा मिळत असल्याचे भासवून भामट्यांनी पुन्हा पैसे गुंतवण्यास प्राेत्साहित केले. त्यानुसार या व्यक्तीने सुमारे १८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र ठरल्याप्रमाणे पैसे न मिळाल्याने व गुंतवलेले पैसेही परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे नाशिकच्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार या व्यक्तीशी संपर्क साधणारे भामटे, ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले ते बँकधारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा-