राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti-2024

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठे जयंती उत्सव, मिरवणुका काढण्याचे नियोजन आखले जात आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti-2024)

येत्या सोमवारी (दि.१९) शिवजयंती असून, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळांतर्फे शिवजयंतीचे नियोजन केले जात आहे. पोलिस ठाणेनिहाय विविध परवानग्या घेतल्या जात असून, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यावर सर्वांचा भर दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. सण, उत्सव साजरे करा, मात्र नियमांच्या चौकटीत करा, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे. पोलिस ठाणेनिहाय उत्सव समित्यांशी चर्चा करून त्यांना नियमांची आठवण करून दिली जात आहे. कोणत्याही मंडळाने डीजेचा वापर करू नये, साउंड सिस्टिमचा आवाज मर्यादित ठेवावा, गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची सूचना पोलिसांकडून केली जात आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti-2024)

समाजकंटकांची धरपकड
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून शहरातील टवाळखोरांसह उत्सव काळात गोंधळ करणाऱ्यांची धरपकड करून त्यांना समज दिली जात आहे. साध्या वेशातील पोलिस, सीसीटीव्ही यासह इतर माध्यमातून शिवजयंतीवर पोलिस यंत्रणा करडी नजर ठेवण्यासाठी नियोजन करीत आहेत. नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, अंबड, भद्रकाली या परिसरातून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक गर्दी भद्रकाली व नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत होणार असल्याने त्यानुसार बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे.

राजकीय शक्तिप्रदर्शन
आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून अनेकजण शिवजयंतीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात लोकसभा व विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार, राजकीय पक्ष यांच्यात चढाओढ राहू शकते. तसेच जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेकजण मंडळांना पाठबळ देत त्यांना आगामी निवडणुकीत स्वत:च्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे नियोजन सुरू
शहरात पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. सुमारे १,२०० पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. मिरवणुकीत डीजेला मनाई राहणार असून, उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन सुरू आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असून. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित केली आहे. मिरवणुकीसह सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर राहणार आहे. राज्य राखीव पोलिस दल, होमगार्डची अतिरिक्त कुमक बंदोबस्तात राहणार असून, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक, स्ट्रायकिंग फोर्स, गुन्हे शाखा व वाहतूक विभागाची पथकेही बंदोबस्तात असतील.

हेही वाचा:

The post राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन appeared first on पुढारी.