शेअर मार्केट : भामट्यांकडून अल्पावधीत जास्तीच्या नफ्याचा फंडा

नाशिक : गौरव अहिरे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना ११ कोटी १२ लाख ४३ हजार ९५८ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतवता आभासी संकेतस्थळ-ॲप वापरून नागरिकांना फसवले जात आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चालू वर्षात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा आणि कमी कालावधीत श्रीमंत करण्याचा फंडा वापरून भामटे सर्वसामान्यांना गंडवत असल्याचे उघड झाले आहे.

काबाडकष्ट करूनही अपेक्षित स्वप्न पूर्ण होत नसल्याने अनेक जण पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था करत असतात. त्यात अनेक जण अतिरिक्त कष्ट करून, अभ्यासपूर्ण गुंतवणुकीद्वारे जादा पैसे कमवण्यावर भर देतात. तर काही जण ऐकीव माहिती, प्रलोभणांना बळी पडून कमी कालावधीत जादा पैसे कमवण्याचे स्वप्न बघतात. भामटेदेखील अशाच व्यक्तींना गृहीत धरून त्यांना कमी कालावधीत जादा पैसे कमवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घालत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांतच २० ते ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. नागरिकांकडून पैसे घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये न गुंतवता पैशांचा अपहार करतात. तसेच नागरिकांना विश्वास बसावा यासाठी मेलवरून किंवा स्क्रीन शेअर करून तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आहे, असे भासवले जाते. त्यामुळे विश्वास बसल्याने नागरिक अधिक पैशांची गुंतवणूक करताना दिसत आहेत. स्वत:कडील पैसे संपल्यानंतर तसेच भामट्यांकडे पैसे मागितल्यानंतर ते न मिळाल्यास फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यातही अनेक जण पोलिसांकडे तक्रारी करत नसल्याचेही आढळून आले आहे. तर ज्यांनी वेळेत तक्रारी केल्या त्यांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश मिळत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, फसवणूक करणारे भामटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने हे प्रकार अद्याप सुरूच आहे.

अशी होते फसवणूक

  • व्हॉट्सअप, टेलिग्राम, सोशल मीडिया माध्यम किंवा फोनवरून संपर्क साधून जादा परताव्याचे आमिष दाखवले जाते.
  • उच्चशिक्षित, सेवानिवृत्त नागरिक सर्वाधिक बळी
  • पैसे घेतल्यानंतर स्वत:च्या ॲपमध्ये शेअर्स घेतल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात शेअर खरेदी केलेले नसतात.
  • गुंतवणुकीवर नफा झाल्याचे दाखवून जास्त पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले जाते.
  • पैसे मागितल्यानंतर ते देण्यास टाळाटाळ केली जाते. थाेडे पैसे गुंतवल्यास एकत्रित पैसे दिले जातील असे सांगून पुन्हा पैसे मागतात.
  • पैसे न दिल्यास भामटे संपर्क तोडतात.

अशी घ्या खबरदारी

  • शेअर मार्केटची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. वेळ नाही म्हणून दुसऱ्यास पैसे देऊन गुंतवणूक करण्यास सांगू नये.
  • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास स्वत:चे डीमॅट खाते लागते.
  • त्या खात्याचा वापर स्वत: करावा, ते दुसऱ्यास देऊ नये.
  • फसवणूक झाल्यास १९३० क्रमांकावर संपर्क साधावा.

फसवणुकीचा आकडा कित्येक पटीत

सायबर पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांनुसार ११ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात फसवणुकीचा हा आकडा कित्येक पटीने जास्त असल्याचे बोलले जाते. कारण सायबर पोलिसांकडे फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जही प्राप्त आहेत. तर पैसे पुन्हा मिळतील या आशेने किंवा बदनामी होईल या भीतीपोटी अनेकांनी फसवणूक झाल्यानंतरही पोलिसांना अद्याप तक्रारी केलेल्या नाहीत.

खातरजमा करूनच गुंतवणूक करा

नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी पडू नये. शेअर मार्केटचा अभ्यास करून गुंतवणूक करावी. आभासी व्यक्तींच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तासाभरात १९३० या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी. फसवणूक झाल्यास तक्रार देण्यास उशीर करू नये. तातडीने तक्रार दिल्यास पैसे परत मिळवण्याची शक्यता वाढते. – रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

 

हेही वाचा: