नाशिक ( सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर बाजार समितीच्या येथील मुख्य बाजार आवारासह नायगाव येथील उपबाजारात सोमवार (दि. २२) पासून सकाळी १० वाजता कांद्यासह शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे व संचालक मंडळाने केले आहे. तसेच वाहनांतील शेतमाल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या खळ्यावर खाली करून द्यावयाचा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बाजार समितीने मार्केट सुरू करावे, कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून आम्ही स्वतः माल खाली करणार आहोत. त्याबद्दल आम्हाला हमाल मापाऱ्याची तोशिष लागू नये, असे सांगत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सिन्नर बाजार समितीकडे लिलाव सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून १ एप्रिलपासून हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात करण्यास नकार दिलेला आहे व माथाडी कामगार युनियनने हिशेबपट्टीतून प्रचलित पद्धतीप्रमाणे हमाली, तोलाई व वाराई कपातीची मागणी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज २० दिवसांपासून बंद आहे.
सद्यस्थितीत शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने व आर्थिक झळ सोसून उन्हाळ कांदा पिकविलेला आहे. त्यातच लग्नसराई हंगाम सुरू असल्याने शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कांदा साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शेतातच उघड्यावर पडलेला आहे. बाजार आवार बंद असल्याने व त्याची विक्रीची सुविधा नसल्याने उघड्यावर पडलेला कांदा भिजण्याची व नुकसानीची शक्यता असल्याने बाजार समितीने कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. – शशिकांत गाडे, सभापती.
हेही वाचा: