सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

कांदा प्रश्न,www.pudhari.news

राकेश बोरा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

निर्यात शुल्कावरून भडकलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उपाय म्हणून केंद्राने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली खरी, मात्र कांदा खरेदीचा हा निर्णय आठ दिवसांपूर्वीचाच असून, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते व उत्पादकांनी व्यक्त केली आहे. निर्यातशुल्क वाढवण्यापूर्वी कमाल २६०० रुपये दर मिळत असताना, २४०० रुपये दराने खरेदी काय उपयोगाची? असा सवाल करीत सध्या जिल्ह्यात असलेला ४० लाख टन कांदा खरेदी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. या समस्येवर निर्यातशुल्क रद्द करणे हा एकमेव उपाय असल्याचा पवित्रा शेतकरी नेते व शेतकऱ्यांनी घेतला आहे. Onion News

केंद्र सरकारसह नाफेडने केलेली उपाययोजना म्हणजे सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, सरकार खरेदीचा देखावा करत आहे. शेतकऱ्यांना उल्लू बनविण्याचे उद्योग सरकारने थांबवावे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

केंद्र सरकार विषय भरकटवत आहे. दोन लाख मेट्रिक टन खरेदी हा विषय आठ दिवसांपासून सर्वांना माहिती असताना राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकरी हिताचा कोणता निर्णय घेतला? कांद्याची जागेवर 25 ते २६ रुपये किंमत असताना २४ रुपयांत कांदा खरेदी करून सरकार स्वतःची पाठ धोपटून घेत आहे. मुळात निर्यात शुल्कासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते. निर्यातीसाठी जे कंटेनर रवाना झाले आहे त्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तो न घेता विषय बदलण्याचा करण्याचा केंद्राचा डाव आहे.

– निवृत्ती न्याहारकर, शेतकरी

 

केंद्र सरकारने निर्यातशुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवून एक प्रकारे निर्यात बंदीसारखे निर्णय घेऊन शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा खरेदीचा देखावा सरकार करत आहे. यापुढे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर केंद्र सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

-सुनील गवळी, ब्राह्मणगाव, विंचूर

————-

कांदा खरेदीच्या निर्णयाचा कोणताही सकारात्मक परिणाम होणार नाही. सरकारला शेतकऱ्यांना दिलासा द्यायचाच असेल, तर तातडीने निर्यातशुल्क रद्द करावे आणि त्यानंतर कांदा खरेदी करावी. अथवा शेतकऱ्यांचा ४० लाख टन कांदा याच दराने खरेदी करावा. शेतकऱ्यांना उल्लू बनवणे केंद्र सरकारने आता थांबवले पाहिजे.

-विष्णू शिंदे, शेतकरी

——-०——–

हेही वाचा :

The post सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on पुढारी.