नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दोन दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅनडा कॉर्नर येथील एका बड्या सराफी व्यावसायिकांकडून तब्बल २६ कोटींची रोकड खोदून काढली. तर ९० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तांचे दस्तावेज जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्वेलर्स दुकानांसह वर असलेल्या त्याच्याच डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग तीस तास तपासणी करीत, हा ऐवज शोधून काढला आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक, नागपूर व जळगाव अशा तिन्ही पथकांनी नाशिकमध्ये तळ ठोकत ही कारवाई केली. सुमारे ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी अचानक गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ६ च्या सुमारास सुराणा ज्वेलर्स यांची सराफी पेढी व वरच्याच मजल्यावर असलेल्या महालक्ष्मी रिअल इस्टेटच्या कार्यालयात छापा टाकला. तसेच राका कॉलनी येथील त्यांच्या आलिशान बंगल्यासदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. तसेच शहरातील विविध कार्यालये, लाॅकर्स व बँकांमधील लॉकर्सची तपासणी केली. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तावेज पथकाने जप्त केले. तब्बल दोन दिवस कारवाई करीत तब्बल २६ कोटींची रोकड जप्त केली. तसेच मालमत्तांचे दस्तावेज असलेला पेन ड्राइव्ह तसेच हार्डडिस्क पथकाने जप्त केले. दरम्यान, आर्थिक माहिती दडवल्याच्या संशयातून आयकर विभागाने ही कारवाई केली असून, शहरातील इतरही बांधकाम व्यावसायिक तसेच सराफ व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
नोटा मोजण्यासाठी १४ तास
सराफ व्यावसायिकाकडे तब्बल २६ कोटींची रोकड आढळून आली असून, ती मोजताना स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. वास्तविक, स्टेट बँकेला शनिवारी सुटी होती. मात्र, बँकेच्या मुख्यालयात सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी रोकड मोजण्यासाठी योगदान दिले. सकाळी ७ पासून कर्मचारी रोकड मोजत होते. तब्बल १४ तास रोकड मोजण्याची प्रक्रिया सुरू होती.
सात कारने रोकड रवाना
कापडी पिशव्या, ट्रॅव्हलर्स बॅग, ट्रॉली बॅग्जमध्ये भरलेली रोकड सात कारमधून मोजणीसाठी सीबीएसजवळील स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली. शनिवारी (दि.२५) रात्री ११.३० वाजता नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोकड ताब्यात घेतली. दरम्यान, आयकर विभागाने प्रथमच छापा पहाटेऐवजी सायंकाळी टाकत ऐवढे मोठे घबाड उघडकीस आणल्याने, शहरातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
फर्निचर तोडून पैसे काढले
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ३० तास कारवाई करीत २६ कोटींची रोकड जप्त केली. अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान लपवलेली रोख रक्कम बाहेर काढण्यासाठी व्यावसायिकाच्या बंगल्यातील फर्निचर तोडल्याचेही समोर येत आहे. सिनेस्टाइल पद्धतीने ही कारवाई केल्याने, व्यापाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा: