
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आधारसेवा केंद्रामार्फत आधारकार्ड अपडेशन करताना बायोमेट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे तिघांनी नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे संकलित केले. त्यानंतर सीएससी डीजीपे या ऑनलाइन मनी ट्रान्सफर सर्व्हिस ॲपमध्ये नागरिकांचे ठसे वापरून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून गंडा घातला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गंडा घालणाऱ्या तिघांना पकडले आहे.
तिघांनी आधार ईनेबल पेमेंट सिस्टिम (एईपीएस) मार्फत बँक खातेधारकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. संशयितांमध्ये एक धुळे येथील महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून, तो प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याचे काम करीत होता. तर इतर दोघे चाळीसगाव येथील आधारसेवा केंद्रावर काम करत होते.
नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील १५ नागरिकांच्या बँक खात्यातून भामट्यांनी परस्पर ऑनलाइन दोन लाख ६६ हजार ७९९ रुपये काढून गंडा घातला होता. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सायबर पोलिसांना सूचना देत आरोपी पकडण्यास सांगितले. त्यानुसार सायबरचे पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनील पाटील, सारिका चौधरी, उपनिरीक्षक दीपक देसले, अंमलदार बिपीन चौधरी, प्रमोद जाधव, परिक्षित निकम, डी. बी. बागूल, नितीन करंडे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले आदींच्या पथकाने तपास केला. त्यात किशोर लक्ष्मण सोनवणे (२१), रवींद्र विजय गोपाळ (२३) व सोमनाथ काकासाहेब भोंगाळ (२३, तिघे रा. ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांना पकडले.
पोलिस तपासात नागरिकांच्या बोटांचे ठसे वापरून पैसे काढल्याचे उघडकीस आले. संशयितांनी आधार ईनेबल पेमेंट सिस्टिम (एईपीएस) मार्फत गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. संशयितांकडून पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइल, फोर फिंगर स्कॅनर मशीन, आयरीस मशीन असा ऐवज जप्त केला आहे. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या तपासाबद्दल पोलिस अधीक्षक उमाप यांनी तपासी पथकास १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
जानेवारी महिन्यात संशयितांनी नांदगाव येथील पळाशी व वेहेळगाव येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प घेतला होता. त्यात नागरिकांच्या बायोमेट्रिक फिंगर स्कॅनरवरून अंगठ्यांचे ठसे घेतले. संशयितांनी ठशांचा डाटा संकलित करून त्याचा गैरवापर करीत बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले. संशयितांनी फसवणुकीतील पैशांवर मौजमजा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
नागरिकांनी शासनमान्य आधार सेवा केंद्रावरच आधारसंबंधित माहिती अद्ययावत करावी. अनधिकृतपणे आधार अपडेशन कॅम्प कोणी घेत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच एईपीएस सेंटरद्वारे फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित बँक शाखा व पोलिसांकडे तक्रार करावी.
– शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
हेही वाचा :
- रायगड: रोहात मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले
- सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना
- धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
The post सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.