Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर तसेच गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या धुव्रनगरसह शिवाजीनगर, श्रमिकनगरमध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढतच आहे. या भागात पेट्रोलचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, आता वाहनांचे स्पेअरपार्ट चोरण्याचेही प्रकार वाढले आहेत. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सातपूर शिवाजीनगरला लागून असलेल्या धुव्रनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोलचोरीच्या घटना समोर येत आहेत. चोरटे रात्रीच्या वेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून पेट्रोल लंपास करतात. त्याचबरोबर वाहनांचे स्पेअर पार्टही चोरून नेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हा भाग मुख्यत्वेकरून कामगारांची वसाहत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या घाईमध्येच गाडीतील पेट्रोल संपल्याचे दिसून येत असल्याने, संबंधित व्यक्तीला हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याशिवाय दुचाकी तसेच चारचाकीचे साइड ग्लास काढून नेणे, दुचाकीचे सीट चोरणे, डिक्की काढून नेणे, एक्सीलेटरसह स्वीच किट काढून नेणे, दुचाकी-चारचाकीचे चाकं चोरून नेण्याचेही प्रकार समोर येत आहेत. कधीकाळी मोजकीच घरे असलेल्या या परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांत मोठमोठे प्रकल्प उभारले गेले आहेत. त्यामुळे ही वसाहत पूर्णपणे गजबजली आहे. याचाच फायदा भुरटे चोर घेताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

सायकलचे चाक चोरीला

धुव्रनगर परिसरात राहणाऱ्या एका चिमुकलीची सायकल पार्किंगमध्ये होती. रात्रीच्या सुमारास भुरट्या चोरांनी सायकलीचे एक चाक लंपास केले. चोरटे बिल्डिंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, लवकरच ते पोलिसांना सुपूर्द केले जाणार असल्याचे चिमुरडीच्या पालकांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास होत असल्याने, पोलिसांनी या भागात गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव appeared first on पुढारी.