मालेगाव मनपात लेखणी बंद आंदोलन, आयुक्तांवर दुषित पाणी फेकल्याचा निषेध

मालेगाव मनपा,www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
जुना आग्रा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या रास्ता रोको प्रसंगी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यावर दुषित पाणी फेकल्याचा प्रकार घडला होता. त्याच्या निषेधार्थ मनपातील अधिकारी कर्मचारी यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केले.

आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने आयुक्त गोसावी हे कर्तव्य बजावत आमदार मोलाना मुफ्ती मो. इस्माईल व आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चेसाठी गेले होते. तेव्हा काही समाजकंटकांनी गरम चहा व गटारीचे पाणी फेकले. सदरचा गैरप्रकार हा अत्यंत खेदजनक, निंदणीय आहे. शासकीय कामात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय पुढाऱ्यांकडून दबाब आणला जातो व यातूनच तयार झालेल्या रोषांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अर्वाच्य भाषेत बोलले जाते. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अशी दबंगगिरी केली जात असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला.

शासकीय अधिकारी, कर्मचारी हे कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य शासनाने भारतीय दंड विधानांतर्गत संरक्षण प्रदान केलेले आहे. त्यास अनुसरुन गुरुवारच्या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपर पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

हेही वाचा :

The post मालेगाव मनपात लेखणी बंद आंदोलन, आयुक्तांवर दुषित पाणी फेकल्याचा निषेध appeared first on पुढारी.