देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
येथील नागरिकांसह बाहेरूनही खाण्यासाठी येथे येणाऱ्या एका सुप्रसिद्ध उपाहारगृहासह लॅम रोडवरील अन्य थाळी व मिठाईच्या दुकानांची अचानक तपासणी करताना लष्करी व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना एक्स्पायरी डेट असलेले मसाले व अन्य पदार्थ आढळून आले. अधिकाऱ्यांनी सर्व पदार्थ नष्ट करताना तीन ठिकाणच्या कारवाईत १५ हजार रुपयांचा दंड वसूल करत नोटीस बजावल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी दिली आहे.
फेब्रुवारीत मिठाई स्ट्रीट परिसरात बिर्याणीची विक्री करणाऱ्या दुकानात १२ किलो गोमांस आढळून आले होते. त्यानंतर प्रथमच लष्करी व कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य पथकाने देवळालीसह लॅम रोडवरील विविध उपाहारगृहे, मिठाई व खाद्यपदार्थ दुकानांची बुधवारी अचानक तपासणी केली. दोषी आढळलेल्या उपाहारगृहांकडून सुमारे १५ हजार
रुपये दंड आकारला. येथील बेलतगव्हाण रोडवरील आमची माती, आमची माणसे या उपाहारगृहांमध्ये स्टेशन हेल्थ ऑफिसरचे आरोग्य अधीक्षक संजय ठुबे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, निरीक्षक अतुल मुंडे, शिवराज चव्हाण, साजेब सय्यद आदींनी तपासणी केली. त्यात विविध मुदतबाह्य मसाले, दोन-तीन किलो उसळीमध्ये किडे, तर काही मसाल्यांसह मेयॉनीज हे देखील एक्स्पायरी देत उलटूनही वापरात असल्याचे आढळले. याशिवाय उपाहारगृहाच्या कुल्फीत बुरशी आढळून आली. तपास पथकाने हे सर्व पदार्थ जागीच नष्ट केले. खाद्यपदार्थ देण्यासाठी आहे. वापरात असलेले पाण्यासाठी प्लास्टिकचे डबे निकृष्ट दर्जाचे सापडले. त्यामुळे या उपाहारगृहास पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यासोबत लॅम रोडवरील महासागर थाळी व पवन मिल्क सेंटर येथे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने त्यांनाही पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा: