रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

नाशिक क्राईम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थांच्या व्यवहारातील संशयितांची धरपकड सुरू केली असून, सराईत गुन्हेगारांवर येत्या काही दिवसांत तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेच्या कारवाईदेखील प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, आयुक्तालयातील विशेष शाखेंतर्गत निवडणूक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील, स्वरूपाच्या माहितीचे संकलन केले जात असून, बंदोबस्ताचेही नियोजन सुरू आहे. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना अवैध धंदेचालक, विविध गुन्ह्यांमधील संशयितांची धरपकड करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकांनी विविध गुन्ह्यांतील संशयितांची यादी तयार केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एक व दोनसह मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि विशेष गुन्हे शाखेची पथके संशयितांचा शोध घेत त्यांची धरपकड करीत आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात पोलिसांकडून कठोर कारवाईची शक्यता आहे. तसेच वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनीही वाहतूक नियम मोडणाऱ्यांसह धोकादायक वाहने चालवणारे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कारवाईचे नियोजन सुरू
आगामी निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेस कोणताही धोका होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. त्यानुसार अवैध शस्त्रविक्री, बाळगणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. त्याचप्रमाणे अवैध दारू, गुटखा वाहतूक-साठा व विक्री करणारे, जुगार खेळणारे व खेळवणाऱ्यांचीही यादी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे कोणत्या गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित करायची व कोणत्या गुन्हेगारांना चांगल्या वर्तवणुकीचे ‘बाँड’ करण्यास सांगायचे याचीही यादी तयार केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

The post रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव appeared first on पुढारी.