नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या जमीन अधिगृहनातच सरकारची अधिकाधिक शक्ती व्यर्थ होत असल्याने, सिंहस्थाचे योग्य नियोजन करता येत नाही. अशात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सिंहस्थ, कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरूपी पाचशे एकर जागा खरेदी करावी, तसेच गोदावरी स्वच्छता, सिंहस्थ परिक्रमा मार्ग व वंशावळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Kumbh Mela Nashik)
इतिहासात प्रथमच देशाच्या पंतप्रधानांनी गोदाघाटावर येऊन गोदापूजन व आरती केल्याच्या प्रसंगाने भारावलेल्या नाशिकच्या पुरोहित संघाने पंतप्रधान मोदी यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, ‘जमीन अधिग्रहणासाठी केंद्राने राज्य सरकारला पैसा द्यावा. शेतकऱ्यांकडून जमीन घेताना त्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पंचवटी कॉरिडॉर करण्याची मागणी केली. काशी व उज्जैनप्रमाणे पंचवटी कॉरिडॉर उभारल्यानंतर पंचवटीतील भाविकांची संख्या वाढून धार्मिक पर्यटन वाढीला चालना मिळू शकणार आहे. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर यांना जोडण्यासाठी ६० मीटर रुंदीचा सिंहस्थ परिक्रमा मार्ग उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. हा सिंहस्थ परिक्रमा मार्ग सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी उभारण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर नाशिकमध्ये दानशूर व्यक्तींनी बांधलेल्या धर्मशाळांचा वापर कॉम्प्लेक्ससाठी करीत आहेत. पूर्वी या धर्मशाळांचा वापर यात्रेकरूंसाठी केला जात होता. आता मात्र त्या विकल्या जात असल्याने, याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणीही निवेदनाद्वारे केली. (Kumbh Mela Nashik)
वंशावळीचे व्हावे जतन
नाशिकच्या पुरोहितांकडे हजारो वर्षांच्या वंशावळ आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे व त्यांच्या पूर्वजांच्या वंशावळ आहेत. काबूल, कंंदहार येथून पूर्वी यात्रकरू यायचे त्यांच्या वंशावळ आहेत. काश्मीरचा राजा महाराजा हरिसिंग त्यांच्या नवव्या पिढीचा महाराजा ध्रुपददेव यांच्या स्वत:च्या हस्ताक्षराने लिहिलेला लेख आहे. हा एक अमूल्य ठेवा असून, त्याचे जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी हरिद्वार, कुरुक्षेत्र तसेच बिहार येथील राजगीर स्टेटच्या पार्श्वभूमीवर पुराेहितांना खोल्या बांधून द्याव्यात, अशीही मागणी पुरोहितांकडून पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली.
हेही वाचा :
- अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स
- Pune : अंगणवाडी सेविका संपावर ठाम
- वटवाघळांच्या अभ्यासातून सापडणार मधुमेह नियंत्रणाचा मार्ग
The post सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी? appeared first on पुढारी.