सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उन्हाळा सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला असला, तरी गंभीर पाणीबाणी निर्माण होईल अशी नैसर्गिक स्थिती सध्या तरी नाशिकककरांच्या नशिबी नाही. असे असले, तरी सिडको व अंबड परिसरात सध्या महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी नागरिकांना पाणीबाणीला समोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे अंबड भागातील मळे परिसरात मध्यरात्री पाणीपुरवठा, तोही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको, अंबड भागाला पूर्वी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे सिडकोतील काही भागाला कायमची पाणी समस्या निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने आता गंगापूर धरणातून केवळ नवीन सिडको कॉलनी भागाला पाणीपुरवठा होतो. तर मुकणे धरणातून पाथर्डी फाटा येथील जलकुंभाला पाणी पुरविले जाते. तेथून पाथर्डी, अश्विननगर, गणेश चौक, महाराणा प्रताप चौक, जुने सिडको, लेखानगर व गोविंदनगर या भागास पुरवठा केला जातो. आता मुकणे धरणातून मुंबई नाकापासून पुढे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जुने सिडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
धरणात पाणीसाठा असूनही पाणीपुरवठा विभागाकडून नियोजनाअभावी जलकुंभ पूर्ण भरले जात नसल्याचे वास्तव आहे. जलकुंभ पूर्ण भरलेला नसल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे कुटुंबाला लागणारे आवश्यक पाणी मिळत नाही. प्रभाग २८ मधील उमा पार्क, गजानन नगर, पूजा पार्क या भागांत शनिवार (दि. 25) व रविवार (दि. 26) दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी पवननगर जलकुंभावर ठिय्या आंदोलन केले. जलकुंभ पूर्ण भरत नसल्याने संपूर्ण सिडको व कॉलनी भागात ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
दिवसा पाणीपुरवठा करा
अंबड गाव परिसरात मळे भाग मोठ्या प्रमाणात आहे. या विभागात रात्री १२ वाजता पाणीपुरवठा होतो, तर काही मळे भागात पहाटे 3 वाजता पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. मनपाने या भागात दिवसा पाणीपुरवठा करण्याची मागणी महिला व नागरिकांनी केली आहे. मनपा आयुक्तांनी लक्ष घालून सिडको व अंबड भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.
रस्त्यावर पाण्याचा अपव्यय
उत्तमनगर, अंबड लिंकरोडला बुरकुले हॉलसमोर पाण्याच्या पाइपलाइनला गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना, दुसरीकडे होणारा पाण्याचा अपव्यय नागरिकांचा संताप वाढविणारा ठरत आहे.
प्रभाग २८ मधील गजानननगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे. घरात पाणीच नसेल, तर कुठलेच काम होत नाही. – सुरेखा ठोके, गृहिणी.
उमा पार्क परिसरात भर उन्हाळ्यात पाणी समस्या आहे. मनपा पाणीपुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. – संगीता भावसार, गृहिणी.
पूजा पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकाचा संयम सुटेल. – खुशाल शेवाळे, नागरिक.
अंबड भागातील रामकृष्ण दातीर मळे परिसरात मध्यरात्री १२ वाजता पाणीपुरवठा होतो. तोही कमी दाबाने होत आहे . मनपाने आमच्या भागात दिवसा पाणीपुरवठा करायला पाहिजे. –मनीषा दातीर गृहिणी.
अंबड भागातील शिरसाट मळे परिसरात मध्यरात्री कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. घराला लागणारे आवश्यक पाणी मिळत नाही. – सुरेखा शिरसाठ, गृहिणी
अंबड गाव व मळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर राजीव गांधी भवनवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. – शरद दातीर, सामाजिक कार्यकर्ते.
प्रभाग क्रमांक २८ मधील पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर मनपा आयुक्त कार्यालयावर प्रभागातील नागरिक व महिलांचा मोर्चा काढला जाईल. -डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक.
पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी नियोजन केले पाहिजे. जुने सिडकोतील बडदेनगर येथील दोन्ही जलकुंभ पूर्ण भरले पाहिजे. जलकुंभ पूर्ण भरल्यास जुने सिडको भागात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. – राजेंद्र महाले, माजी नगरसेवक.
हेही वाचा: