नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी, दि ८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती व दानपेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार रोख रकमेचा पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.
देवळा येथील कोलथी नदी काठावर असलेल्या देवळा शहर वासियांचे ग्रामदैवत दुर्गा माता मंदिराला लागून असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुवार, दि ८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार रोख रुपये व एक स्वामी समर्थांची मूर्ती पळवली आहे. शुक्रवार, दि ९ रोजी मंदिराचे सेवेकरी किशोर आहेर हे नित्य नियमानुसार मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने इतर शिष्यांना सांगितल्यावर त्यांनी मंदिराकडे धाव घेत पोलिसांना कळवले. दरम्यान, चोरट्यांनी लागूनच असलेल्या दुर्गा माता मंदिरातील दानपेटी देखील फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
देवळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गेल्या महिन्यातच दत्त जयंती उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने दान पेटीत जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये जमा झाल्याचा अंदाज सेवेकरी किशोर आहेर यांनी सांगितले. दान पेटीची एक चावी दिंडोरी संस्थानाकडे असते व एक सेवेकरी यांच्याकडे असते. लवकरच दानपेटी खोलून ती रिकामी करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच चोरट्यांनी दानपेटी फोडून रकम व मूर्तीचा पोबारा केल्याने गावात खळबळ उडाली आहे. सेवेकऱ्यांनी या घटनेमुळे नाराजी व्यक्त केली आहे.
The post स्वामी समर्थांच्या मूर्तींसह पन्नास-साठ हजार रक्कमेचा पोबारा appeared first on पुढारी.