नाशिक/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- दीड महिन्यांपुर्वी दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन शिक्षकांची तुफान हाणामारी झाली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल यांनी व्हिजीट केलेल्या वाडीवऱ्हे शाळेमध्ये चालू वेळेतच मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळा बंद केली होती. या दोन्ही प्रकरणात सीईओ मित्तल यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पैकी दिंडोरी तालुक्यातील शिक्षक निलंबीत करण्यात आले आहेत तर वाडीवऱ्हेच्या मुख्याध्यापकसह शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत सोमवारी आदेश देण्यात येणार आहे.
दोन महिने उलटूनही कारवाई नव्हती
दिंडोरी तालुक्यातील दोन शिक्षकांची हाणामारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेत शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केला होता. परंतु, दोन महिने उलटूनही देखील कारवाई होत नव्हती. जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी (दि. २४) तत्काळ दखल घेत दोन्ही शिक्षकांचे निलंबन केले आहे.
तसेच मार्चच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या वाडीवऱ्हे शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली होती. त्यावेळी शाळेला कुलूप लावलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती असे लक्षात आले होते की तेथील मुख्याध्यापिकेने परस्पर निर्णय घेत विद्यार्थ्यांना वेळ होण्यापूर्वीच शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी सर्वच घरी निघून गेलेले होते. याबाबत सीईओ मित्तल यांनी शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सीईओ यांनी सांगितले आहे.
पूर्व-वैमनस्यातून दोघांमध्ये हाणामारी
दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 येथे केंद्रप्रमुखांनी दि. 13 मार्च 2024 रोजी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पूर्व-वैमनस्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 चे शिक्षक प्रवीण दिनकरराव देशमुख (दळवी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर येथील धनंजय विष्णू क्षत्रिय या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला असताना देखील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
दिंडोरीमध्ये शिक्षकांचा घडलेला प्रकार चुकीचा आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. शिक्षकांचे निलंबन करण्यात आलेले आहे. तसेच वाडीवऱ्हेमध्ये नियमित वेळेमध्ये शाळा बंद केल्याचा प्रकार घडला होता. या चुकीच्या प्रकारामुळे मुख्याध्यापकसह शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्यावर देखिल कारवाई करण्यात येईल.
– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
हेही वाचा-