४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे, उद्धव ठाकरे, शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फुटणार आहे. निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन्ही पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या ११ जागा महायुती जिंकेल, पुढचा पाचवा टप्पा देखील आम्हीच जिंकणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकास्त्र डागले. बावनकुळे म्हणाले की, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पराभूत होणार आहे. पवारांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा चार तारखेनंतर फुटणार असून मविआचे तुकडे तुकडे होणार आहे. राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी दोन पक्ष आता चार तारखेला राज्यात दिसणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबतही बावनकुळे भाष्य केले आहे. जेव्हा पराभव होतो, पराभवाचे लक्षणं दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणे नॉर्मल आहे. हे ते बोलतच राहणार, पराभव जसा जवळ दिसेल, ईव्हीएम खराब आहे. मशीन खराब झाली आहे. मशीनमध्ये दोष आहे, असे आरोप ते करतील. परसेंटेजचा दोष सांगतात. निवडणूक निर्णय अधिकारी शेवटपर्यंत सांगत नाही. यांना आता पराभव दिसत असल्याने असे लक्षण दिसत आहे, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

संजय राऊत यांचे आरोप फेटाळले

राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीतील आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा दिला आहे. यावर बावनकुळे यांनी बोलण्यास नकार दिला. सकाळी ते बोलले म्हणून आम्ही बोलले पाहिजे असे काही नाही असे सांगत बावनकुळे यांनी राऊत यांचे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा-