अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्चप्रमाणेच एप्रिल महिन्यातही सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला आहे. मागील तीन दिवसांत 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिके, फळपिके, कांदा, भाजीपाला पिके बाधित झाली असून अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यात कृषी आयुक्तालयाकडून झालेल्या पीक नुकसानीचा ताजा अहवाल सोमवारी (दि.10) मिळाला असून त्यामध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे.
प्रमुख जिल्हानिहाय झालेली पीक नुकसानीची आकडेवारी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. अहमदनगर 9 हजार 265, नाशिक 8 हजार 3, अकोला 5 हजार 859, छत्रपती संभाजीनगर 2 हजार 915, धाराशीव 2 हजार 859, बीड 2 हजार 762, बुलडाणा 1 हजार 174 हेक्टरवरील पिके अवकाळी आणि गारपिटीमुळे बाधित झालेली आहेत.
या शिवाय रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, पुणे, सोलापूर, सातारा व अन्य जिल्ह्यातील पिकांनाही अवकाळीचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. नुकसानीमध्ये आंबा, काजू, नारळ, पपई, केळी, कांदा, भाजीपाला, मका, ज्वारी, गहू, हरभरा, शेवगा, लिंबु, संत्रा, द्राक्षे, भुईमूग, खरबूज, कलिंगड, झेंडू आदींचा समावेश आहे.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यात 8 एप्रिल रोजी वादळी पाऊस आणि जोरदार वार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर धाराशीवमधील कळंब तालुक्यात झालेल्या गारांच्या पावसामुळे कलिंगडे फुटुन शेतकर्‍यांचे काही ठिकाणी शंभर टक्के नुकसान झाले आहे. मुठीच्या आकाराच्या गारांमुळे अन्य पिकांचे नुकसान झाले असून विजेच्या खांबावरील पेट्या, पीव्हीसी पाईपही फुटल्याचे दोन दिवसात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले आहे.
                                 – विनयकुमार आवटे, सहसंचालक (विस्तार) कृषी आयुक्तालय, पुणे.

The post अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.