आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी

अपघात

नाशिक : गौरव अहिरे
औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्याजवळील सिग्नलवर झालेल्या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अपघातांची कारणे व त्यावरील उपाययोजना शोधली जात आहे. दरम्यान, नाशिक शहरात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत 120 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरपर्यंत 635 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात चालू वर्षात 906 अपघातांमध्ये 755 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 635 गंभीर जखमी झाले असून, 133 जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी दररोज तिघांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण भागात सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र आढळून आले आहेत, तर शहरातही 15 अपघातप्रवण क्षेत्र आहेत. अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील हे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसते. नाशिक शहरात सप्टेंबर अखेरीसपर्यंत 120 जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात 103 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरीसपर्यंत 587 पुरुष व 48 महिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी केलेल्या पाहणीत सर्वाधिक अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे आणि वेगावर नियंत्रण न ठेवल्याने झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यात सुरक्षिततेसाठी असलेले हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे अनेकांच्या जिवावर बेतले आहे. त्याचप्रमाणे जखमींना वेळेवर मदत न मिळाल्यानेही अनेकांचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळ ते मध्यरात्रीच्या वेळी झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे, अंधार, रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघात घडल्याचेही समोर आले आहे.

सप्टेंबर अखेरीस 120 जणांचा अपघाती मृत्यू  :  103 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरीसपर्यंत 587 पुरुष व 48 महिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ब्लॅक स्पॉट कमी करण्यावर देणार भर : शहरासह ग्रामीण भागात ब्लॅक स्पॉट असून, तेथे उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मात्र, वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे रस्त्यांची दुरवस्था, वाहनांची देखभाल- दुरुस्ती नसणे, वाहनांचा वेग या कारणांमुळेही अपघात होत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा:

The post आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी appeared first on पुढारी.