इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

एअरगन www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार व परिसरात दहशत पसरविणाऱ्यास पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून सिनेस्टाईलने मालासह रंगेहाथ पकडून जेरबंद केले. गुरुवारी (दि.२२) रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपीचे नाव वैभव विनायक बोराडे (वय २७, रा. रामरावनगर, बेकरी गल्ली, घोटी) असून, तो दोन देशी बनावटीच्या पिस्तूल व एक एअरगन असा शस्त्रांचा साठा घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे फाट्याजवळ आला असता त्यास सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलिस हवालदार दीपक आहिरे, गोरक्षनाथ संवत्सरकर, किशोर खराटे, पोलिस शिपाई विनोद टिळे, गिरीश बागूल यांनी सापळा रचून दोन पंचांसमक्ष रंगेहाथ पकडून पंचनामा करीत अटक केली. त्याच्या कब्जातील शस्त्रसाठा हस्तगत केला. हस्तगत शस्त्रांची किंमत अंदाजे ३२ हजार ५०० रुपये आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई विनोद टिळे यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे व पोलिस पथक करीत आहे.

हेही वाचा:

The post इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई appeared first on पुढारी.