उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून डेरेदाखल झाला असताना उत्तर महाराष्ट्र मात्र पाणीटंचाईच्या झळांनी होरपळून निघाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील २३६ गावे आणि वाड्यांना ९६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. याद्वारे तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे.

अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आठवडाभर उशिराने नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. तळकाेकणासह दक्षिण महाराष्ट्रात हजेरी लावणाऱ्या पावसाला संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जनतेला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. विभागातील धुळे व नंदुरबारवगळता उर्वरित तिन्ही जिल्ह्यांमध्ये टँकरचा फेरा सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्रात सध्या नाशिक, नगर व जळगाव या तीन जिल्ह्यांमधील ८९ गावे आणि १४७ वाड्यांमध्ये ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात एक लाख २२ हजार ७०१ आणि जळगाव जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ६३५ रहिवाशांना अनुक्रमे ५७ व २५ टँकरच्या सहाय्याने पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात ३४ हजार ८४४ जनतेला १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी पाचही जिल्ह्यांत १४५ विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. यापैकी ११९ विहिरी गावांसाठी, तर २६ विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत. धुळ्यामध्ये अधिग्रहीत केलेल्या विहिरींमधून तब्बल ५५ हजार ८४५ नागरिकांना पाणी पुरविण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील टँकर

जिल्हा    गावे                  टँकर

नाशिक   ९८                ५७

जळगाव  २२                २५

अहमदनगर ११६          १४

————-

एकूण २३६                  ९६

The post उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा appeared first on पुढारी.