एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेऊन, अजित पवार मुख्यमंत्री होणार : एकनाथ खडसे

ekanath khadse

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यामध्ये याआधी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री असेच चित्र होते. मात्र आता अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामील झाल्याने त्यांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. बहुमत असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये प्रवेश देण्यात आला. ही बाब एकनाथ शिंदेंसाठी धोक्याची घंटा आहे. आता शिंदेंच्या आमदारांची गरज राहिलेली नाही. त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला, तरी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार टिकून राहील. उद्या शिंदेंना राजीनामा द्यायला लावून, अजित पवारांना मुख्यमंत्री केल्यास आश्चर्य वाटू नये, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथ खडसे यांनी हा दावा केला आहे. यावेळी आमदार खडसे यांनी राज्यात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या गोंधळावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे सरकार होते. यात आता अजित पवारांचा गट सामील झाल्याने तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सहाजिकच तिन्ही पक्षांचे मंत्रिमंडळ जाहीर होऊन राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतु खाते वाटपासंदर्भात गेल्या 10 दिवसांपासून केवळ चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात मंत्री आहेत पण परंतु खाते नाही, असे राज्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. याचा अर्थ सरकारमध्ये कुठेतरी असंतोष आहे. प्रत्येकाला मलाईदार खाते हवे आहे. यात आता जे खातेवाटप झाले, ते खाते सोडायला मंत्री तयार नाहीत. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत, अशी टीका आमदार खडसे यांनी केली आहे.

आमदारांवर मुख्यमंत्र्यांचे कुठलेही नियंत्रण नाही…

अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले, त्यामुळे त्यांना आता महत्त्वाची खाती द्यावी लागणार आहेत. तसेच ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांनाही त्या दर्जाची खाती द्यावी लागणार आहेत. खातेवाटप करणे ही मोठी कसरत आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ही कसरत करावी लागणार आहे. प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवे आहे. काहीतर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आमदारांवर मुख्यमंत्र्यांचे कुठलेही नियंत्रण नसून, राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही खडसे म्हणाले.

हेही वाचा :

The post एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेऊन, अजित पवार मुख्यमंत्री होणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.