‘एकलव्य’साठी देशात आता एकच सोसायटी, ‘एनईएसटीएस’चे असणार नियंत्रण

एकलव्य निवासी शाळा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने नवव्या पंचवार्षिक योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर एकलव्य निवासी शाळा स्थापन करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी राज्यनिहाय सोसायटीची निर्मिती करण्यात आली होती. आता केंद्राने एकलव्य शाळांमध्ये सुसूत्रता आणण्याची जबाबदारी नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडन्ट अर्थात ‘एनईएसटीएस’वर सोपविण्यात आली आहे.

राज्य महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या ३९ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ३७ एकलव्य निवासी शाळा कार्यान्वित असून, त्यामध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (नवी दिल्ली) यांच्याशी संलग्न असून, या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावी (विज्ञान) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण असते.

दरम्यान, देशभरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ७४० एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी ३८ हजार शिक्षक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुढील टप्प्यात शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याची चर्चा आहे.

राज्य सोसायटीचे कर्मचारी हवालदिल

‘एनईएसटीएस’च्या भरतीमुळे राज्य सोसायटीचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ६३ शिक्षक सेवेत कायम आहेत, तर सन २०१८ पासून कार्यरत असलेल्या अडीचशे कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. ‘एनईएसटीएस’ या राज्य सोसायटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करणार का ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा : 

The post 'एकलव्य'साठी देशात आता एकच सोसायटी, 'एनईएसटीएस'चे असणार नियंत्रण appeared first on पुढारी.