एलईडी पथदीपांमुळे ९५ कोटींची वीजबचत

एलईडी पथदीप www.pudhari.news

नाशिक : आसिफ सय्यद

शासनाच्या ऊर्जा धोरण २०१७ अंतर्गत शहरातील पथदीपांकरिता पीपीपी तत्त्वावर राबविलेला स्मार्ट लायटिंग प्रकल्प नाशिक महापालिकेसाठी वरदान ठरला आहे. शहरातील तब्बल एक लाख पाच हजार पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे गेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या वीज खर्चात तब्बल ९५.२० कोटी रुपयांची, तर १२.४६ कोटी युनिट विजेची बचत झाली आहे. वीजबचतीचा हा दर ६२ टक्के असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वीजखर्चात झालेल्या बचतीचा ९५ टक्के हिस्सा प्रकल्प राबविणाऱ्या टाटा प्रोजेक्टस‌् कंपनीला अदा करण्यात आला असून, या प्रकल्पावर एकही रुपया खर्च न करताही रॉयल्टीपोटी महापालिकेच्या पदरात ४.७६ कोटी रुपये पडले आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) शहरातील पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्टस‌् कंपनीमार्फत राबविण्यात आला आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. एस्को खाते, पारंपरिक ऊर्जेवर होणाऱ्या खर्चाइतकी रक्कम एस्क्रो खात्यावर जमा करणे, विद्युत खांब बदलणे, गंजलेल्या पोलचा हिशेब न लागणे आदी कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. दिरंगाईमुळे मक्तेदार कंपनीला दंडही करण्यात आला होता. अखेर शहरातील १ लाख पाच हजार पथदीपांवर वीजबचत करणारे स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. डिसेंबर २०२० पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. पथदीपांवरील जुन्या फिटिंगच्या वॅटेजप्रमाणे गेल्या तीन वर्षांत महापालिकेला सुमारे १६० कोटींचे वीजदेयक अदा करावे लागले असते. एलईडी फिटिंगमुळे मात्र केवळ ६५ कोटींचा वीज खर्च झाला आहे. वीज ९५.२० कोटींची बचत झाली आहे. टाटा प्रोजेक्टस‌् कंपनीसमवेत झालेल्या करारानुसार वीजबचतीच्या रकमेतून महापालिकेला ५ टक्के रॉयल्टीपोटी ४.७६ कोटी रुपयांचा हिस्सा मिळाला आहे. तर प्रकल्प साकारणाऱ्या टाटा प्रोजेक्टस‌्ला ९०.४४ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

देखभाल-दुरुस्ती खर्चातही १५ कोटींची बचत

पथदिवे दुरुस्ती साहित्य खरेदीतही वार्षिक अंदाजे ४ ते ५ कोटींची बचत होत आहे. पथदीप दुरुस्तीसाठी वापरात असलेल्या वाहन खर्चातही वार्षिक अंदाजे १ कोटीची बचत होत आहे. स्मार्ट लायटिंगच्या देखभाल दुरुस्तीसाठी कमांड कंट्रोल रूम स्थापित करण्यात आली आहे. पथदीपांच्या देखभाल-दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चापोटी गेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या सुमारे १५ कोटींची बचत झाली आहे.

पथदीपांची माहिती एका क्लिकवर

पथदीप चालू बंदची माहिती एका क्लिकवर अॅपद्वारे मिळते. नागरिकांना अॅपद्वारे पथदिवे तक्रार नोंदविता येते. त्यामुळे तक्रारींचे निराकरण सर्व्हिस लेव्हलप्रमाणे वेळेत पूर्ण होते, असा दावा महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प सुरळीत सुरू आहे. या प्रकल्पात महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही. रस्त्यावर राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रकाशाची तीव्रता निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडिट केले जात आहे. – अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, विद्युत, मनपा

—-

वार्षिक बचत झालेले वीज युनिट

कालावधी                                             बचत झालेले युनिट

डिसेंबर २०२० ते मार्च २०२१               १,२०,१४,२५३

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२                  ३,७६,४२,६६९

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३                 ४,०५,६६,८४५

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४         ३,४४,६३,२८३

स्मार्ट एलईडी प्रकल्पाविषयी…

* पीपीपी तत्त्वावर स्मार्ट लायटिंग प्रकल्पाची अंमलबजावणी

* टाटा प्रोजेक्ट‌स‌्मार्फत शहरात १.०५ लाख पथदीपांवर एलईडी दिवे

* सोडियम दिव्यांमुळे मनपाला वार्षिक ५० ते ५५ कोटींचे वीजबिल

* एलईडी दिवे बसविल्यामुळे वार्षिक वीज खर्च २२ ते २५ कोटींवर

* एलईडी दिव्यांमुळे वार्षिक सरासरी ६२ टक्के वीजबचत

हेही वाचा :

The post एलईडी पथदीपांमुळे ९५ कोटींची वीजबचत appeared first on पुढारी.