‘नासाका’ जमीनविक्रीला विरोध, पळसेकर जाणार न्यायालयात

पळसे,www.pudhari.news

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ‘नासाका’ची जमीन विक्रीसंदर्भात काढलेल्या निविदेला पळसे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, अतिरिक्त जमीन विक्री निविदा रद्द करावी अन्यथा आंदोलन करू, असा पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांनी जिल्हा बॅंकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचीही तयारी केली आहे.

ग्रामपंचायतीने १९७४ मध्ये गायरान जमीन ग्रामस्थांच्या हितासाठी नि:शुल्क पद्धतीने कारखाना उभारणीसाठी दिली होती. हे क्षेत्र आज बँकेच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर अथवा विक्री करण्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. त्याविरोधात ठराव ग्रामसभेत करत उच्च न्यायालयात अपिलात जाण्याचा निर्णय झाला आहे.

जिल्हा बॅंकेने खासदार हेमंत गोडसे यांच्या कंपनीसोबत ‘नासाका’चा भाडे करार केल्याने चार तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखाना सुरू झाल्याचा आनंद होत असताना, सुमारे १४० कोटी रुपयांचे कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅंकेच्या ताब्यातील कारखान्याचे अतिरिक्त क्षेत्र विक्री किंवा भाड्याने देण्याबाबत निविदा काढण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निविदा प्रकाशित होताच पळसे ग्रामस्थांनी सलग दोन ग्रामसभा घेऊन लागलीच दुसरी विशेष ग्रामसभा घेऊन बँकेच्या या प्रयत्नांना विरोध दर्शवला आहे.

गुरुवारी (दि. ८) सकाळी १० वाजता येथील मारुती मंदिरात ग्रामसभा झाली. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी पळसे गावाने साखर कारखाना उभारणीसाठी गायरानाची जागा दिलेली आहे. ही जागा कारखान्याचे कर्ज फेडण्यासाठी विक्रीला काढणे बेकायदेशीर आहे. गायरानाची जागा बॅंकेला विक्री करता येणार नसून बॅंकेची जमीन विक्रीबाबतची भूमिका संशयास्पद असल्याने सदरची निविदा रद्द करावी अन्यथा त्याविरोधात संपूर्ण गाव आंदोलनात उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

बैठकीला ‘नासाका’चे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ आगळे, कामगार नेते विष्णुपंत गायखे, नासाका संघर्ष समितीचे विलास गायधनी, पोलिसपाटील सुनील गायधनी, शिवसेना शाखाप्रमुख दीपक गायधनी, सरपंच प्रिया गायधनी, उपसरपंच समाधान गायखे, माजी सरपंच नवनाथ गायधनी, शेतकी संघाचे संचालक शरद गायखे, दिलीप गायधनी, किरण नरवडे, शांताराम जाधव, माधव गायधनी, गणेश गायधनी, अॅड. सोपान गायधनी, अॅड. महेश गायधनी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

The post 'नासाका' जमीनविक्रीला विरोध, पळसेकर जाणार न्यायालयात appeared first on पुढारी.