ओझर नगरपरिषद हद्दीतील ‘त्या’ अतिक्रमणावर अखेर हातोडा

ओझर अतिक्रमण हातोडा,www.pudhari.news

ओझर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कचाट्यात अडकून पडलेल्या  येथील नगरपरिषद हद्दीतील सावित्रीमाई चौक (गडाख कॉर्नर) ते धन्वंतरी हॉस्पिटल पर्यंतचा रस्त्यातील अतिक्रमण अखेर नगरपरिषदेने गुरूवार (दि.१९) रोजी हटवले. यावेळेस अतिक्रमणधारक व पोलीस तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्यात थोड्या कुरबुरी झाल्या. अखेर दुपारी चार नंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी कडक भुमिका घेत अतिक्रमित टपऱ्यांवर जेसीबी फिरवण्यास सुरवात केल्यानंतर संबंधितांनी स्वताहुन आपल्या टपऱ्या सदर ठिकाणाहून हलवल्या.

ओझर शहरातील प्रवेशद्वार असलेला सावित्रीमाई फुले चौक (गडाखकॉर्नर) ते धन्वतंरी हाॅस्पिटल हा रस्ता  हिंदुस्थान एरोनॉटीक्स लि. या कंपनीच्या सी.एस. आर फंडातून करण्यात येणार आहे. या रस्त्यालगत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ३८ टपरीधारक व्यवसाय करत होते. या गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषद व अतिक्रमण धारक यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू होती. काही दिवसांपुर्वी न्यायालयाने नगरपरिषदेच्या बाजुने निकाल दिला.

सदर रस्ता करताना रस्त्यात बाधित होणा-या अनधिकृत टपऱ्या तथा बांधकामामुळे अडथळा निर्माण होणार असल्याने नगरपरिषदेमार्फत त्यालगत असलेल्या अतिक्रमण अनाधिकृत ३८ टपरीधारक तथा बांधकाम हटविणे बाबत २१ जून रोजीच नोटीस बजावली होती परंतु त्यावर काहीही कार्यवाही न केल्याने नगरपरिषदेने पोलिस फोर्स व सबंधित यंत्रणे मार्फत अतिक्रमण हटावची कार्यवाही सुरु केली.

हिंदुस्थान एरोनॉटीक्स लि. या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून तयार होणाऱ्या रस्त्यास सदर अतिक्रमित / अनाधिकृत टपऱ्या तथा बांधकामांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने सदर मार्गात बाधित होत असणाऱ्या अतिक्रमित /अनाधिकृत टपऱ्या तथा बांधकामे सदरची नोटीस मिळताच तात्काळ ७ दिवसांचे आत सदर अतिक्रमित /अनाधिकृत टपऱ्या तथा बांधकामे आपले स्वखर्चाने निष्कासित करण्यात यावे. अन्यथा नगरपरिषदे मार्फत सदर अतिक्रमित /अनाधिकृत टपऱ्या तथा बांधकामे निष्कासित करण्यात येईल. व आपणा विरूध्द महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदी अन्वये आपणावर कारवाई प्रस्थापित करण्यात येईल. अशी नोटीस दिली होती. त्याचा कोणताही परिणाम दिसून न आल्याने नगरपरिषदेने रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहिम कारवाई केली. या वेळी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. अतिक्रमण केलेल्या टपरीधारकांना  त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ३१ जणांना जुन्या पोलिस गेट जवळ पर्यायी जागा आखून देण्यात आली.

असा होणार रस्ता 
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि. या कंपनी मार्फत सीएसआर (सामाजिक दायित्व) फंडातून सुमारे अडीच कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांसाठी पेव्हर दोन्ही बाजूला ड्रेनेज तसेच सुशोभिकरण सावित्रीमाई चौक (गडाख कॉर्नर) ते धन्वंतरी हॉस्पिटल हा मुख्य रस्ता होणार आहे.

माजी आमदारांच्या जीन्यावरही कारवाई 

माजी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयात जाणारा जीना हा देखील या अतिक्रमण मोहीमे दरम्यान काढण्यात आला. तर येथील छत्रपती चौक (सायखेडा फाटा) येथील उड्डाणपूला खाली असणारी भाजी मंडई तसेच सर्व्हीस रस्त्यालगत असणारे फ्लेक्स देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हटविण्यात आले.  छत्रपती चौक (सायखेडा फाटा) येथे असणारे अतिक्रमण देखील हटवावे अशी मागणी आता नागरीक करत आहे.

हेही वाचा :

The post ओझर नगरपरिषद हद्दीतील 'त्या' अतिक्रमणावर अखेर हातोडा appeared first on पुढारी.